Highway Jalgaon to Mumbai | खान्देश महामार्ग: जळगाव ते मुंबई फक्त 5 तासांत, समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी


जळगाव ते छत्रपती संभाजीनगर खान्देश द्रुतगती महामार्ग उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचे अंतर देखील कमी होणार आहे.

खान्देश द्रुतगती महामार्ग उभारण्याची योजना

राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर खान्देश द्रुतगती महामार्गदेखील उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

सध्या मुंबईहून जळगावला जाण्यासाठी साडेसात ते आठ तास लागतात. नव्या खान्देश महामार्गामुळे हा प्रवास सुमारे पाच तासांत पूर्ण करता येईल.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचे सध्याचे साडेतीन ते चार तासांचे अंतर अवघ्या एका तासात पार होईल.

यामुळे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

महामार्ग
महामार्ग

9 ते 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित

एमएसआरडीसीने या महामार्गाचा मार्ग निश्चित केला आहे. जळगावपासून सुरू होणारा हा सहापदरी, प्रवेश-नियंत्रित महामार्गहा धरणगाव, जामनेर किंवा पहूर, फर्दापूर किंवा सोयगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरजवळ समृद्धी महामार्गाशी थेट जोडला जाणार आहे.

एकूण लांबी सुमारे 105 किलोमीटर आहे. प्रकल्पासाठी अंदाजे 9 ते 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्वेक्षण पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे.

कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल

या महामार्गामुळे जळगावसह धुळे आणि नंदुरबारसारख्या खान्देशातील भागांना समृद्धी महामार्गाशी जलद संपर्क मिळेल. समृद्धी महामार्ग सध्या राज्यातील दहा प्रमुख जिल्ह्यांना जोडतो.

खान्देश महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. केळीसारख्या शेतमालाची मुंबई व नागपूरसारख्या बाजारपेठांपर्यंत जलद वाहतूक शक्य होईल.

हा महामार्ग ग्रीनफिल्ड स्वरूपाचा असून त्यात इंटरचेंज, पूल आणि आवश्यक पायाभूत सुविधा समाविष्ट असतील. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या मते, एकदा हा महामार्ग सेवेत आला की मुंबई-जळगाव अंतर पाच तासांत कापता येईल.

समृद्धी महामार्गाचा विस्तार अधिकाधिक जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

खान्देश महामार्ग पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील दळणवळण अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!