CJP Meeting News | अभिजीत दिपके सुरू करणार ‘क्या बोलती पब्लिक’ देशव्यापी अभियान


छत्रपती संभाजीनगर: कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी (६ ऑगस्ट) आपल्या घरी झालेल्या कोअर टीमच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

जनतेचा आवाज मुख्य प्रवाहात आणणार : अभिजीत दिपके

सप्टेंबर महिन्यापासून देशव्यापी ‘क्या बोलती पब्लिक’ सार्वजनिक अभियान सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून दिपके आणि त्यांची टीम देशभरात फिरून थेट जनतेशी संवाद साधणार आहे.

अभिजीत दिपके म्हणाले, “आता जनतेचीच गरज आहे. आम्ही ‘क्या बोलती पब्लिक’ कॅम्पेन सुरू करत आहोत. देशभरातील लोकांच्या अडचणी समजून घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

हे अभियान निवडणुकीसाठी नसून दबावगट म्हणून काम करेल. जनतेचा आवाज थेट मुख्य प्रवाहात आणणे आणि युवकांच्या समस्यांना प्राधान्य देणे हे याचे ध्येय आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • शिक्षण व्यवस्था सुधारणा : हा अभियानाचा पहिला आणि मुख्य मुद्दा. शाळा, महाविद्यालये व कोचिंगची फी प्रचंड वाढली आहे. पहिलीच्या प्रवेशासाठीच वर्षाला १ ते २ लाख रुपये फी आणि डोनेशन द्यावे लागत आहे. सामान्य कुटुंबांवर आर्थिक बोजा पडत असल्याने शिक्षण स्वस्त आणि सर्वांसाठी उपलब्ध करण्याची मागणी.
  • बेरोजगारी : सुमारे ८० टक्के बेरोजगार युवकांकडे पदवी आहे, पण नोकरी मिळत नाही. पदवी नसलेलेच सरकार चालवत असल्याची टीका अभिजीत दिपके यांनी केली.
  • युवकांकडे दुर्लक्ष : देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, तरीही त्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.
  • संस्थांवरील विश्वास : न्यायव्यवस्था, प्रशासन आणि इतर संस्थांवरील घटता विश्वास पुनर्स्थापित करणे.
  • सामाजिक न्याय व संविधान : CJP ची विचारधारा संविधानावर आधारित असून धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि अहिंसेला प्राधान्य.

नागरिक संघटनांना एकत्र आणणार

सप्टेंबरपासून देशभरातील शहरे आणि गावांमध्ये थेट संवाद साधला जाईल. सर्व नागरिक संघटनांना एकत्र आणून शिक्षण, रोजगार आणि शासन सुधारणांसाठी दबाव निर्माण केला जाईल.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेमुळे युवकांच्या समस्यांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवण्यात युवकांना यश आल्याचे स्मरण केले.

आता लोक रस्त्यावर उतरून जबाबदारी मागण्यास घाबरत नाहीत, असे त्यांनी सांगितले.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!