संस्थात्मक उत्तरदायित्व (अकाउंटेबिलिटी) निश्चित करण्यासाठी हा युवा मोर्चा ‘दबाव गट’ म्हणून काम करेल, असे अभिजित दीपके ने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची अभिजीत दिपके यांची घोषणा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे.
संस्थात्मक उत्तरदायित्व (अकाउंटेबिलिटी) निश्चित करण्यासाठी हा युवा मोर्चा ‘दबाव गट’ म्हणून काम करेल, असे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
सीजेपीचे कार्यकर्ते झारखंडला जाऊन आंदोलकांची भेट घेतील, असेही त्यांनी सांगितले.
सशक्त दबाव गटाची गरज
छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीच्या कोअर टीमच्या बैठकीपूर्वी अभिजीत दीपके म्हणाले, “लोकांचा न्यायव्यवस्था, राजकारण, माध्यम आणि निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे.
आमच्या आंदोलनाला देशभर पाठिंबा मिळाला. हे आंदोलन केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संस्थात्मक उत्तरदायित्वाचा मुद्दा बनले आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एका सशक्त जन-दबाव गटाची अत्यंत गरज आहे.”
रास्त मागण्यांचे समर्थन करू
झारखंड लोकसेवा आयोग (जेपीएससी) आणि इतर भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी झारखंडबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीमार्फत व्हावी, या मागणीसाठी रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर 29 जुलैपासून परीक्षांचे उमेदवार बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा देताना दीपके म्हणाले, “आम्ही नक्कीच झारखंडला जाऊ, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि आंदोलनातील त्यांच्या प्रत्येक रास्त मागणीचे समर्थन करू.”








