मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आरटीआय (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार सुनील शेळके यांनी सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप
पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आरटीआय (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली असून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नक्की काय घडलं?
आमदार शेळके हे दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते.
त्याच वेळी कार्यालयात आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर देखील उपस्थित होते.
गुजर यांच्यावर संशय आल्याने आमदार शेळके यांनी गुजर यांना एका खोलीत नेले. तिथे त्यांची बॅग ओढून तिची तपासणी करण्यात आली.
या बॅगेत ‘शेळके’ नावाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याचा दावा आमदारांनी केला आहे.
यानंतर शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला खोलीत डांबून मारहाण केल्याचा गंभीर आरोप सुनील गुजर यांनी केला आहे.
आमदारांचे प्रतिआरोप: “माझ्यावर पाळत ठेवून माहिती गुन्हेगारांना पुरवली”
मारहाणीचे आरोप फेटाळत आमदार सुनील शेळके यांनी गुजर यांच्यावरच गंभीर प्रतिआरोप केले आहेत.
“सुनील गुजर हे गेल्या वर्षभरापासून माझ्यावर पाळत ठेवत आहेत. ते दुसऱ्यांच्या नावाचा वापर करून आरटीआय अंतर्गत माझ्याशी संबंधित माहिती गोळा करतात.
ही माहिती नंतर ते माझ्या राजकीय विरोधकांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पुरवत आहेत,” असा खळबळजनक दावा शेळके यांनी केला आहे.
पोलीस तपासात काय समोर आले? (CCTV फुटेजचे सत्य)
गुजर यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तत्परतेने जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार
- फुटेजमध्ये सुनील गुजर यांना एका खोलीत नेण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- मात्र, बाहेर उपलब्ध असलेल्या कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार शेळकेंनी सुनील गुजर यांना मारहाण केल्याचे दिसून आलेले नाही.
- ज्या खोलीत गुजर यांना नेण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता.
पोलीस प्रशासनाची भूमिका
बंद खोलीत कॅमेरा नसल्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा सध्यातरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.









