Jalgaon Ganesh Visarjan | जळगावात शासकीय वाहनातून गणेश विसर्जन; राज्य उत्पादन शुल्क विभाग वादाच्या भोवऱ्यात!


शासकीय वाहनातून गणेश विसर्जन केल्याचा प्रकार जळगाव मध्ये  उघडकीस आला आहे, या प्रकरणावरून राज्य उत्पादन शुल्क विभाग वादात सापडला आहे.

शासकीय वाहनाचा वापर गणेश विसर्जनासाठी

जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वाहनाचा वापर करून गणेश विसर्जनासाठी केल्याचा एक धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी या संदर्भातील एक चित्रफीत (व्हिडिओ) सोशल मीडियावर प्रसिद्ध केली असून, यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

शासकीय वाहनाचा गैरवापर आणि कर्तव्यावर असताना विना गणवेश राहिल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर केला जात आहे.

वाहनाची चित्रफीत देखील वायरल

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध झालेल्या या चित्रफितीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी एका शासकीय वाहनात (क्रमांक एमएच १९) बसून गणेश विसर्जनासाठी जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विशेष म्हणजे, हे सर्व कर्मचारी शासकीय कर्तव्याच्या वेळेत किंवा शासकीय वाहनात असताना कोणत्याही अधिकृत गणवेशात नव्हते.

ते सर्वजण साध्या कपड्यांमध्ये वाजत-गाजत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.

उत्पादन शुल्काचे अधीक्षक म्हणतात माहिती नाही

या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचा हवाला देत, शासकीय साधने व वेळेच्या वापराबाबत नियमांचे पालन होण्याची गरज व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, जनतेच्या करातील पैशांवर चालणाऱ्या वाहनांचा असा वापर करण्याबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रदीप पोटे यांनी या संदर्भातील व्हिडिओबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या गणेश विसर्जन प्रकाराची विभागीय चौकशी झाल्यानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येईल, आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!