RBI News | आता या चलनी नोटा बदलणार, RBI चा सर्वात मोठा निर्णय, कारण काय?


भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनी नोटा अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

कागदाऐवजी प्लास्टिक साहित्याचा वापर करून चलनी नोटा छापल्या जाणार

देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 10 आणि 20 रुपयांच्या छोट्या मूल्याच्या नोटा आता कागदाऐवजी प्लास्टिक (पॉलिमर) साहित्याचा वापर करून छापल्या जाणार आहेत.

बाजारात फिरताना या नोटा खराब होऊ नयेत, फाटू नयेत आणि त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त वाढावे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

सध्या ही संपूर्ण प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असून टेंडर, सॅम्पल आणि टेस्टिंगच्या विविध पातळ्यांवर काम सुरू आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आरबीआयची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’ (BRBNMPL) सक्रिय झाली असून त्यांनी अधिकृत टेंडर (निविदा) जारी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, या जागतिक निविदेसाठी एकूण तीन प्रमुख कंपन्यांनी आपल्या बोली लावल्या आहेत.

यामध्ये दोन विदेशी कंपन्यांचा आणि एका भारतीय कंपनीचा समावेश आहे.

भारताकडून देशातील सर्वात मोठी बीओपीपी (बायऐक्शली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलीन) एक्सपोर्ट कंपनी ‘कॉस्मो फर्स्ट’ या प्रक्रियेत आघाडीवर आहे.

कडक आणि अत्यंत विशेष अटी लागू केल्या

प्लास्टिक नोटांच्या छपाईसाठी आरबीआयने सुरक्षा आणि देशांतर्गत भावनांचा विचार करून काही कडक आणि अत्यंत विशेष अटी लागू केल्या आहेत. कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीला खालील दोन महत्त्वाच्या अटींचे पालन करणे अनिवार्य असेल:

पहिली अट (सुरक्षा आणि अलिप्तता): टेंडर मिळवणाऱ्या कंपनीला सर्वात आधी एक अधिकृत प्रतिज्ञापत्र (डिक्लेरेशन) सादर करावे लागेल.

यानुसार, त्यांना खात्री द्यावी लागेल की त्यांचे भारतातील कामकाज हे चीन किंवा पाकिस्तानशी संबंधित असलेल्या कोणत्याही उपक्रमापासून किंवा गुंतवणुकीपासून पूर्णपणे अलिप्त आणि सुरक्षित असेल.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दुसरी अट (प्राण्यांच्या चरबीवर बंदी): प्लास्टिक नोटा तयार करण्यासाठी जे पॉलिमर बेस मटेरियल वापरले जाईल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची चरबी (Animal Fat) समाविष्ट नसावी.

भारतातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावनांचा आदर राखण्यासाठी प्राण्यांच्या चरबीयुक्त पॉलिमरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

टेस्टिंग नंतरच चलनी नोटा बाजारात

या दोन्ही अटींची पूर्तता केल्यानंतर, संबंधित कंपन्यांना प्लास्टिक नोटांचे काही नमुने (सॅम्पल्स) चाचणीसाठी आरबीआयकडे जमा करावे लागतील.

या नोटा थेट बाजारात आणण्यापूर्वी भारतातील विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये तपासल्या जातील.

देशातील अत्यंत उष्ण, दमट, थंड किंवा बदलत्या हवामानाचा या नोटांवर काय परिणाम होतो आणि त्यांची टिकाऊपणा क्षमता किती आहे, याचे सखोल फील्ड टेस्टिंग केले जाईल.

या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच या नव्या चलनी नोटा सर्वसामान्यांच्या हातात पाहायला मिळतील.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!