१ सप्टेंबर २०२६ पासून प्रवाशांना राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड म्हणजेच ‘एनसीएमसी’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे.
एनसीएमसी कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून प्रवाशांना राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड म्हणजेच ‘एनसीएमसी’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे.
या नवीन नियमांनुसार, ज्या पात्र प्रवाशांकडे हे एनसीएमसी कार्ड नसेल, त्यांना एसटी प्रवासादरम्यान मिळणारी शासकीय तिकीट दर सवलत पूर्णपणे नाकारली जाईल.
राज्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना लेखी आदेश
एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना या संदर्भातील लेखी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून बस वाहकांनी (कंडक्टर) ६५ ते ७५ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट केवळ आणि केवळ त्यांच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर करूनच वितरित करायचे आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी या कार्डचे टॉप-अप (रिचार्ज) करण्याची जबाबदारी देखील वाहकांकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी आता थेट धावत्या बसमध्ये वाहकाकडून कार्ड रिचार्ज करू शकणार आहेत.
महामंडळाने केला हा डिजिटल बदल
शासनाकडून महिलांना तिकीट दरात ५0 टक्के सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांनाही ५0 टक्के सवलत दिली जाते. यापूर्वी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र किंवा इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जात होती.
मात्र, एसटी प्रवासात अधिक सुलभता, पारदर्शकता आणणे आणि बनावटगिरीला आळा घालणे या उद्देशाने महामंडळाने हा डिजिटल बदल केला आहे.
सुरुवातीला ही अट ऑगस्ट महिन्यापासूनच लागू होणार होती, परंतु अनेक लाभार्थ्यांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
आता ही वाढीव मुदत संपल्याने नियम कडक करण्यात आले आहेत.
महामंडळाने सर्व पात्र महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना प्रवासादरम्यान आपले एनसीएमसी कार्ड सोबत बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जर कार्ड जवळ नसेल, तर प्रवाशांना थेट पूर्ण तिकीट दर मोजावा लागणार आहे.









