Educational Gathering for Parents | महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आता वर्षातून चार वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; शिक्षक संघटनांचा मात्र नाराजीचा सूर


राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून घेणार शैक्षणिक मेळावा

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास, पालकांचा शाळेतील सहभाग आणि शाळा-पालक यांच्यातील संवाद वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

वर्षातून चार वेळा होणार मेळावा

शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार प्रत्येक शैक्षणिक वर्षात चार वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित केला जाणार आहे.

जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल या महिन्यांच्या पहिल्या शनिवारी हा मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम शाळास्तरावर प्रत्यक्ष आयोजित केला जाणार आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांचा यामध्ये समावेश असेल.

मेळाव्याच्या आयोजनाची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर (SMC) राहणार आहे.

माता-पालकांशी थेट संवादावर भर

हा मेळावा केवळ औपचारिक पालकसभा न ठेवता माता-पालकांशी थेट संवाद साधण्याचे माध्यम म्हणून विकसित करण्याचा शिक्षण विभागाचा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील प्रगती, अडचणी, उपस्थिती आणि शाळेतील विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यासोबतच शैक्षणिक योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शासकीय योजना, व्यावसायिक शिक्षक, PAT, उपस्थिती भत्ता तसेच डिजिटल शिक्षण यासंबंधीची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

मेळाव्यात कोणत्या विषयांवर चर्चा होणार?

माता-पालक शैक्षणिक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

  • १. शाळा आणि पालकांमध्ये समन्वय : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालकांमध्ये सुसंवाद निर्माण करणे. पालकांच्या सूचना, तक्रारी आणि अपेक्षा यावर मुक्त चर्चा करणे. तसेच APAAR ID, UDISE+ आणि इतर शैक्षणिक नोंदी व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबाबत माहिती देणे.
  • २. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देणे. मूल्यमापन पद्धती, परीक्षा वेळापत्रक, वाचन संस्कृती आणि घरच्या अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगणे. विद्यार्थ्यांसाठी घरी अभ्यासाचे योग्य वातावरण निर्माण करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • ३. उपस्थिती आणि अध्ययनातील अडचणी : विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती का महत्त्वाची आहे, याबाबत पालकांना माहिती देणे. विद्यार्थ्यांचे वर्तन, अध्ययनातील अडचणी आणि गैरहजेरीवर चर्चा करून शाळाबाह्य होण्याचे प्रमाण आणि विद्यार्थी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • ४. आरोग्य, पोषण आणि बालसुरक्षा : विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, पौष्टिक आहार आणि सुरक्षितता याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बालसुरक्षा, बालहक्क आणि बाल संरक्षण याबाबतही जागृती करण्यात येणार आहे.
  • ५. शासकीय योजनांची माहिती : विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय शैक्षणिक योजनांची माहिती पालकांना दिली जाणार आहे. याशिवाय शाळेचे वार्षिक नियोजन, महत्त्वाचे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, सहली, स्पर्धा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहितीही देण्यात येईल.
  • ६. पालकांचा शैक्षणिक सहभाग वाढविणे : शाळेच्या शैक्षणिक कामकाजात आणि विविध उपक्रमांमध्ये माता-पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शिक्षक संघटनांची नाराजी कायम

एकीकडे पालकांचा शाळेतील सहभाग वाढविणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

मात्र, शिक्षकांवर असलेल्या वाढत्या अशैक्षणिक कामांच्या पार्श्वभूमीवर वर्षातून चार वेळा मेळावा आयोजित करण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळणे आवश्यक असताना विविध प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची गरज असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

त्यामुळे ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ हा उपक्रम प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतो आणि शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कसा कमी केला जातो, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!