Pune News | पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; मारहाणीच्या आरोपाने वातावरण तापले


कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बुधवारी वातावरण चांगलेच तापले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वातावरण तापले

पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बुधवारी वातावरण चांगलेच तापले.

वर्षभर परीक्षा देऊनही पुन्हा नापास करण्यात आल्याचा आरोप करत विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन सुरू केले.

या आंदोलनात एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलनादरम्यान विद्यापीठातील सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याचे तसेच मारहाणीची घटना घडल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. परिस्थिती चिघळल्याने अखेर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

परीक्षा देऊनही काही विद्यार्थ्यांना पुन्हा नापास केले

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्षभर परीक्षा देऊनही काही विद्यार्थ्यांना पुन्हा नापास करण्यात आले.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सदैव विद्यार्थीहिताला प्राधान्य देत आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी यावर्षी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

या परीक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी संवाद साधल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.

विद्यापीठ म्हणते कोणताही वाद झाला नाही

विशेष परीक्षेत काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांना बाहेरील काही संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात भडकवण्याचे काम केल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी घडलेल्या घटनेत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात कोणताही वाद झालेला नाही.

सोशल मीडियावर विद्यापीठाच्या विरोधात प्रसारित करण्यात आलेल्या काही क्लिप्स चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

अधिकाऱ्यांवर हात उगारल्याचा आरोप

तसेच, संबंधित संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर हात उगारल्याचा आरोपही प्रशासनाने केला आहे.

या घटनेत विद्यार्थी किंवा शिक्षकांचा कोणताही सहभाग नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ही घटना अवांछित, अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

आंदोलन, मारहाणीचे आरोप आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालाचा वाद यामुळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील परिस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!