मुंढवा आणि धनकवडी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न
पुणे: शहरात किरकोळ वादातून गंभीर गुन्हे घडण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
मुंढवा आणि धनकवडी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: भटक्या श्वानाच्या वादातून दाम्पत्याला मारहाण
मुंढवा येथील केशवनगर परिसरात भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याच्या कारणावरून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चैतन्य यांनी भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात आणल्याने आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला.
या वादाची तक्रार देण्यासाठी चैतन्य आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे निघाले होते.
मात्र, वाटेतच दोघा आरोपींनी त्यांना अडवले. ‘श्वानावरून आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’ अशी विचारणा करत आरोपींनी चैतन्य यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने गंभीर वार केले.
जीव वाचवण्यासाठी हे दाम्पत्य पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या चैतन्य यांच्या पत्नीलाही आरोपींनी बेदम चोप दिला.
या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

दुसरी घटना: धनकवडीत जुन्या वादातून वकिलाच्या मुलावर हल्ला
दुसऱ्या घटनेत, धनकवडीतील गुलाबनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या हल्ल्यात निशांत मुकुंद पिसे (वय ४६, रा. सुवर्णा हाईट्स, धनकवडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी त्यांचे वडील वकील मुकुंद पिसे (वय ७८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी समाधान प्रभू पवार (वय ४२, रा. आंबेगाव पठार, व्यवसाय- भाजी विक्रेता) याला अटक केली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी निशांत गुलाबनगर भागातून जात असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून समाधानने त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
या हल्ल्यात निशांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मिठारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील या लागोपाठच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









