Pune School Girl Student Attack : पुण्यात नववीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात चाकूहल्ला; महाबळेश्वर सहलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने घडला थरार


विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शाळा सुटल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडला.

पुण्यात नववीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात चाकूहल्ला

पुणे: शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थिनींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या वादातून, एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

शाळा सुटल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडला.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद

मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावातील ‘विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल’ या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे सहल गेली होती.

सहलीदरम्यान काही मुली डान्स करत असताना, एका विद्यार्थ्याने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला.

या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. विद्यार्थिनींच्या तीव्र आक्षेपानंतर आणि वाद वाढल्यामुळे त्या मुलाला तो व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करावा लागला होता.

पूर्वीची कोणतीही ओळख किंवा पूर्ववैमनस्य नव्हते

याच गोष्टीचा राग मनात धरून, शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास शाळा सुटताच त्या मुलाने प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनीवर चाकूने अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर शाळेने तातडीने प्रथमोपचार करून तिला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि जखमी मुलगी एकाच शाळेत नववीत शिकत असले, तरी त्यांचे शैक्षणिक बोर्ड वेगळे असल्याने त्यांची पूर्वीची कोणतीही ओळख किंवा पूर्ववैमनस्य नव्हते.

केवळ सहलीतील व्हिडिओवरून झालेल्या पाच दिवसांपूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला.

बावधन पोलिसांनी या घटनेतील विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत ‘विबग्योर स्कूल’ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून काढून टाकले आहे.

मुलगी बालवाडीपासून याच शाळेत शिकत असून, मुलाने गेल्या वर्षीच प्रवेश घेतला होता, अशी माहिती शालेय अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून शाळेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!