आतषबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) संपूर्ण राज्यासाठी एक सार्वजनिक परिपत्रक जारी केले आहे.
आतषबाजीवर पुण्यात येणार कडक निर्बंध
पुणे: दिवाळीसह आगामी सण-उत्सवांच्या काळात फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) संपूर्ण राज्यासाठी एक सार्वजनिक परिपत्रक जारी केले आहे.
या नियमांनुसार, फटाके फोडण्यावर तसेच उत्सवांमधील तीव्र प्रकाशयोजनांवर कडक निर्बंध घालण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
रात्री १० ते सकाळी ६ फटाक्यांना पूर्ण बंदी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचा हवाला देत ‘एमपीसीबी’ने स्पष्ट केले आहे की, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके फोडण्यास पूर्णपणे मनाई असेल.
तसेच, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, मार्ग आणि पदपथांवर (फूटपाथ) फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शांतता क्षेत्रात कडक नियम
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि शासकीय कार्यालये यांच्यापासून १०० मीटरचा परिसर हा ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसराच्या आत कोणत्याही प्रकारची आतषबाजी करता येणार नाही.
उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान २२ सप्टेंबर आणि १५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
हे नियम केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू राहतील.
लेझर आणि बीम लाइट्सवरही बंदी
केवळ फटाकेच नव्हे, तर मिरवणुका आणि उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीव्र प्रकाशझोतांवरही प्रशासनाने फुली मारली आहे.
मानवी डोळ्यांना आणि आरोग्याला घातक ठरणारे लेझर लाइट्स, हाय-इंटेन्सिटी बीम लाइट्स आणि तीव्र विद्युत दिव्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण मोजणारी यंत्रणा (साऊंड लेव्हल मीटर) ठेवणे आयोजकांसाठी बंधनकारक असणार आहे.
आरोग्याला घातक घटकांमुळे निर्णय
फटाक्यांमधून बाहेर पडणारे सूक्ष्म कण, शिसे, बेरियम, तांबे आणि कॅडमियम यांसारखे घातक रासायनिक घटक हवेत मिसळतात.
यामुळे अचानक वाढणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच श्वसन व हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत जीवघेणे ठरू शकते.
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विविध कायदेशीर कलमांन्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ‘एमपीसीबी’ने दिला आहे.
तसेच, नागरिकांना कुठेही नियमांचे उल्लंघन होताना दिसल्यास त्यांनी तातडीने ‘महा पर्यावरण’ (Maha Environment) ॲपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








