Pune Firing News : तळोजा गोळीबार प्रकरणातील ३ आरोपी पुण्यातून जेरबंद; आंबेगाव पोलिसांनी केली धडक कारवाई


तळोजा परिसरात गोळीबार करून एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन फरार आरोपींना पुणे आंबेगाव पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आर्थिक व्यवहारातून गोळीबार करून एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन फरार आरोपींना पुणे शहराच्या आंबेगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे.

२४ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आर्थिक वादातून केला होता गोळीबार

तळोजा (ता. पनवेल, जि. रायगड) येथील फेज-२ मधील मारवा बिल्डिंगच्या खाली आणि शिवाजी चौकाजवळ २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १:१७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले.

फिर्यादीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते.

गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात रचला सापळा

गुन्ह्यातील संशयित आरोपी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना मिळाली.

माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत दत्तनगर परिसरात सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना वेढा घालून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे

  • रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९, रा. म्हस्के चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे)
  • अनिकेत प्रताप नरवडे (वय १९, रा. खंडाळे, रांजणगाव, ता. शिरूर, पुणे)
  • सौरभ गोरख चौधरी (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे)

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी

ही कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि भारती विद्यापीठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे आणि फिरोज शेख यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पूर्ण केली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!