Pune Mpda: अवैध हातभट्टी दारू विक्रेत्या महिला गुन्हेगारावर वारजे माळवाडी पोलिसांची ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई; कोल्हापूर कारागृहात रवानगी


हद्दीतील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीवर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची मोठी कारवाई केली आहे.

महिला आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची मोठी कारवाई

पुणे: शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

याच आदेशाच्या अनुषंगाने वारजे माळवाडी पोलिसांनी हद्दीतील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीवर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची मोठी कारवाई केली आहे.

निकीता रणधिर बिरे (रा. विठ्ठलनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे.

स्थानबद्धतेचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकीता बिरे हिच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या हातभट्टी दारूची विक्री केल्याप्रकरणी यापूर्वी वेळोवेळी कायदेशीर कारवाया करण्यात आल्या होत्या.

मात्र, तरीही तिच्या अवैध दारू विक्रीच्या कृत्यांना आळा बसत नव्हता.

तिच्या गुन्हेगारी कारवायांना वेळीच अटकाव करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज साळुंखे आणि पोलीस अंमलदार विजय खिलारी यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.

चाणाक्षपणे महिला आरोपीला घेतले ताब्यात

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाला मान्यता देत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी एमपीडीए आदेश जारी केला.

या आदेशानुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार अमोल सुतकर, महादेव शिंदे, महिला पोलीस अंमलदार अंकिता मोहोळ व अश्विनी धोत्रे यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत चाणाक्षपणे महिला आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे व सुवर्णा हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे, अंमलदार विजय खिलारी, अमोल सुतकर, महादेव शिंदे, योगेश वाघ, बालाजी काटे, निखील तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमित शेलार आणि सागर कुंभार यांनी सहभाग घेतला.

“यापुढेही वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणी अवैध दारू विक्री, निर्मिती, साठवणूक, वाहतूक अथवा इतर बेकायदेशीर धंदे करताना आढळून आल्यास, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार अशीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल,”

– महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक..


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!