पुण्यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे सामूहिक गणेशस्तोत्र पठण करण्यात आले असून त्याची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे.
गणेशस्तोत्र पठणाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये तब्बल १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे सामूहिक पठण केले. पुण्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये (Asia Book of Records) नोंद झाली आहे.
- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा अनोखा उपक्रम
- १२ हजार ३६० विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सहभाग
उपक्रमाची पडताळणी करून झाली नोंद
गणेशोत्सवातील धार्मिक परंपरांची जोपासना करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
ठरलेल्या वेळेनुसार, सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून एकत्र येत गणेशस्तोत्राचे पठण केले.
या विक्रमी उपक्रमाची पडताळणी करून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’च्या परीक्षक चित्रा जैन यांनी अधिकृत प्रमाणपत्र ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्याकडे सुपूर्द केले.

पुणे शहरातील विविध शाळांचा सहभाग
या उपक्रमात पुणे शहर आणि परिसरातील अनेक नामांकित शाळांनी भाग घेतला. यामध्ये महेश विद्यालय इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूल (कोथरूड), धनिराज स्कूल (वाकड), पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड (कोरेगाव पार्क), जागृती ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स, सिंहगड इन्स्टिट्यूट (एरंडवणे), अहिल्यादेवी शाळा, रमणबाग स्कूल, केएचएस स्कूल कन्नड, न्यू मा. वि. शाळा, हुजूरपागा (कात्रज व नारायण पेठ), हुजूरपागा इंग्लिश मीडियम (नारायण पेठ), क्लारा स्कूल (बी. टी. कवडे रोड व सिंहगड रोड), कटारिया स्कूल, भाऊ रंगारी मंडप किड्स, प्रा. नाथ हरी पुरंदरे प्राथमिक विद्यालय, विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) या शाळांचा प्रामुख्याने समावेश होता.
“गणेशोत्सव हा केवळ एक सण न राहता तो संस्कार आणि सामाजिक एकोप्याचे माध्यम ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी आणि गणेशभक्तीशी जोडण्यासाठी या सामूहिक स्तोत्र पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यात १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने घेतलेला सहभाग हा अत्यंत अभिमानास्पद आहे. या जागतिक विक्रमामुळे गणेशभक्ती आणि संस्कृतीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचण्यास नक्कीच मदत होईल.”
— पुनीत बालन
(उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)









