न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने या वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात स्वतःहून ‘सुमोटो’ जनहित याचिका (PIL) दाखल करून घेतली आहे.
ध्वनी प्रदूषणाविरोधात न्यायमूर्तींनी दाखल केली सुमोटो जनहित याचिका
पुणे: गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे शहरासह राज्यभरात झालेल्या अतिप्रचंड ध्वनी प्रदूषण आणि डीजेच्या दणदणाटाची मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने या वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात स्वतःहून ‘सुमोटो’ जनहित याचिका (PIL) दाखल करून घेतली आहे.
“काही मोजक्या लोकांच्या हट्टामुळे आणि आक्षेपार्ह ध्वनी प्रदूषणामुळे निष्पाप नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही,” असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राज्य सरकारला यावर कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
‘थप्पड’ प्रकरणाने वाद पोहचला न्यायालयात
पुण्यातील ध्वनी प्रदूषणाचा हा वाद कोर्टात पोहचण्यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे.
गणेशोत्सवापूर्वी पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे आणि लाउडस्पीकरच्या आवाजाला कडक विरोध केला होता.
मात्र, एका टीव्ही चॅनेलच्या लाईव्ह मुलाखती दरम्यान एका तरुणाने त्यांना ‘हिंदू सण विरोधी’ ठरवत जाहीरपणे थप्पड मारली होती.
या घटनेनंतर पुण्यातील सजग नागरिक आणि गणेश मंडळे आमनेसामने आले होते, ज्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि मूक मोर्चे निघाले.
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडे बोल
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) चांगलेच धारेवर धरले.
खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, रात्री १० नंतर लाऊडस्पीकर आणि डीजे वाजवण्यास कायदेशीर बंदी असतानाही मध्यरात्रीपर्यंत १२-१ वाजेपर्यंत प्रचंड आवाजात संगीत कसे काय सुरू होते?
तसेच रस्त्यावर डीजे वाजवण्यासोबतच बेकायदेशीरपणे फटाके फोडून हवा आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांना दिले आहेत.
पोलिसांकडून जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई
न्यायालयाच्या या आक्रमक भूमिकेनंतर पुणे आणि मुंबई पोलीस आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहेत. नागपूर आणि सोलापूर शहरांप्रमाणे पुण्यातही डीजे सिस्टीमवर मर्यादा आणल्या जात आहेत.
मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या १० हून अधिक मोठ्या गणेश मंडळांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यांचे महागडे साऊंड सिस्टीम, मिक्सर आणि ॲम्प्लिफायर जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे.
सण-उत्सवांचा आनंद घेताना नागरिकांच्या आरोग्याचा अधिकार डावलता येणार नाही, हे आता न्यायालयाने स्पष्ट केले आहे.









