माहेरच्या मालमत्तेच्या वादातून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे.
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
हुंडा आणि माहेरच्या मालमत्तेच्या वादातून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
माहेरच्या मालमत्तेसाठी होता दबाव
शिल्पा यांनी माहेरच्या मालमत्तेत हिस्सा मागावा, यासाठी सासरच्या लोकांकडून त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता.
काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी सासरच्यांना न सांगता माहेरच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर आपल्या भावांच्या बाजूने सह्या केल्या होत्या. यामुळे संतापलेल्या सासरच्या लोकांनी त्यांचा छळ अधिक वाढवला होता, अशी माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांच्या संसारात दीर्घकाळ छळ
शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये झाला होता. गेल्या १७ वर्षांच्या संसारात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या.
पती दारू पिऊन मारहाण करायचा, तर सासू त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. शिल्पा यांच्या माहेरच्यांनी वेळोवेळी लाखो रुपयांची रोख रक्कम आणि व्यवसायासाठी आर्थिक मदत केली होती.
मात्र, तरीही सासरच्या लोकांचा हव्यास संपला नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल; अटक
शिल्पा यांचे भाऊ संतोष गुलाब कलाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पती सचिन उत्तम गवारे, सासरे उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
माहेरच्या नातेवाईकांचा घातपाताचा संशय
शिल्पा यांनी बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास घेतल्याचा दावा सासरच्यांनी केला आहे.
मात्र, मृतदेहाची स्थिती आणि परिस्थिती पाहता नातेवाईकांनी शिल्पा यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, हा घातपाताचा प्रकार असावा अशी शंका घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, विवाहापूर्वी पती सचिनवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही सासरच्या लोकांनी लपवून ठेवली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.









