सौर ऊर्जा निर्मितीत जळगाव जिल्हा आघाडीवर… 45 हजार 724 ग्राहकांच्या खात्यात 355 कोटी जमा करण्यात आले आहेत.
सौर ऊर्जा प्रकल्पांची एकत्रित क्षमता 296 मेगावॅट
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या जळगाव परिमंडलातील 80 हजारांहून अधिक वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
त्यापैकी 72 हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 560 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान हस्तांतरित झाले आहे.
घरांच्या छतांवर उभारलेल्या सौर ऊर्जाप्रकल्पांची एकत्रित स्थापित क्षमता आता 296 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.

प्रकल्प उभारणीत जळगाव जिल्हा अग्रस्थानी
जळगाव परिमंडलातील तिन्ही जिल्ह्यांपैकी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीत जळगाव जिल्हा अग्रस्थानी आहे.
येथील 50 हजार 917 वीज ग्राहकांनी छतांवर एकूण 189.39 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवले आहेत.
धुळे जिल्ह्यात 20 हजार 368 ग्राहकांनी 73.73 मेगावॅट, तर नंदुरबार जिल्ह्यातील 9 हजार 317 ग्राहकांनी 33.36 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.
अनुदानातही जळगाव अव्वल
सौर ऊर्जाप्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना मिळालेल्या अनुदानात जळगाव जिल्ह्याने स्पष्ट आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील 45 हजार 724 ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये 355 कोटी 55 लाख रुपये जमा झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील 18 हजार 102 ग्राहकांना 140 कोटी 89 लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 8 हजार 206 ग्राहकांना 63 कोटी 90 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे अनुदान प्रक्रिया सुरू आहे.
योजनेअंतर्गत सौर ऊर्जासंचाच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाते. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान मिळते.
अतिरिक्त उत्पन्नाची संधी
छतावरील सौरऊर्जा संचामुळे ग्राहक स्वतःची वीज निर्मिती करू शकतात.
साधारणपणे एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते.
घरगुती गरज भागवल्यानंतर उरलेली अतिरिक्त वीज महावितरणला देणे शक्य होते.
त्यामुळे वीजबिलात बचत होण्यासोबतच अक्षय ऊर्जेलाही चालना मिळते.
योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणकडून सोलर नेट मीटर विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत.
यामुळे निर्मिती, वापर आणि अतिरिक्त वीजेची अचूक नोंद ठेवता येते.
पूर्णपणे ऑनलाइन व फेसलेस प्रक्रिया
सौर ऊर्जाप्रकल्प उभारल्यानंतर ग्राहकांना मोबाइलवर दररोजची वीज निर्मिती, वापर आणि अतिरिक्त वीजेची माहिती मिळते.
त्यामुळे वीज वापराचे नियोजन आणि सौर ऊर्जाचा जास्तीत जास्त वापर करणे सोपे झाले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. महावितरणने स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिल्याने नोंदणीपासून अंतिम मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि फेसलेस पद्धतीने पूर्ण होते.
त्यामुळे ग्राहक व पुरवठादारांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही.
घरगुती वीज ग्राहकांनी सौर ऊर्जा चा पर्याय स्वीकारून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.









