Nashik Pune Railway | नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे च्या मूळ मार्गासाठी चक्काजाम आंदोलन


नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गासाठी 9 ऑगस्ट 2026 क्रांती दिनाचे औचित्य साधून उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन झाले.

हायस्पीड रेल्वे आंदोलन वेळी आमदार तांबे यांना घेतले ताब्यात

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गाजवळ आमदार (नाशिक पदवीधर मतदारसंघ) सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले.

तांबे यांनी यावेळी म्हटले की, “गेल्या २५ वर्षांपासून जनता रेल्वेची वाट पाहत आहे.

भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. रेल्वेचा मूळ मार्ग मंजूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि आगामी काळात महिलांचे स्वतंत्र आंदोलन उभारले जाईल.”

हायस्पीड रेल्वे साठी इतर ठिकाणचे आंदोलन

पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या आवाहनानुसार चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा ते सिन्नरपर्यंत महामार्गावर वाहतूक ठप्प करण्यात आली.

खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात चाकण-तळेगाव चौकात भव्य चक्काजाम झाला.

संगमनेरच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

तांबे समर्थकांसह समृद्धी महामार्गाच्या दिशेने पुढे कूच करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले.

झटापट झाली आणि तांबे यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवताच संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महामार्गावर काही काळ तणाव निर्माण झाला.

गिरीश महाजन यांचा फोन आणि आश्वासन

आंदोलना दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजीत तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

त्यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या तांत्रिक अभ्यासासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती (रेल्वे बोर्ड सदस्य विवेक गुप्ता तसेच पुणे व नाशिक विभागीय आयुक्तांचा समावेश) आधीच गठीत करण्यात आली आहे.

समितीचा अहवाल आणि जनसुनावणीबाबतचा निर्णय पुढील सात दिवसांत घेतला जाईल;

समितीला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आश्वासनही महाजन यांनी दिले. (समितीला 60 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.)


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!