Murlidhar Mohol : पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयला मद्यधुंद चालकाचा कट; गुन्हा दाखल


केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्व्हॉय एका मद्यधुंद चालकाने आपली गाडी घुसवून मंत्र्यांच्या वाहनाला कट मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्यात घुसवली गाडी

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्यात (कॉन्व्हॉय) एका मद्यधुंद चालकाने आपली गाडी घुसवून मंत्र्यांच्या वाहनाला कट मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी ३२ वर्षीय कारचालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या वेळी आरोपी चालक प्रचंड दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चालकाने केले होते मद्यप्राशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडली.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून शिवाजीनगरमार्गे कोथरूड येथील आपल्या निवासस्थानाकडे कॉन्व्हॉयसह जात होते.

त्याच वेळी शुभम विजय वनीत (वय ३२, रा. नाना पेठ) या चालकाने मद्यप्राशन करून आपली कार बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवत थेट व्हीआयपी कॉन्व्हॉयमध्ये घुसवली.

पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही पुढे जाण्याचा प्रयत्न

मंत्र्यांच्या सुरक्षा पथकात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले (वय ५०) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी शुभम वनीत याने पुढे जाण्याच्या घाईत मंत्री मोहोळ यांच्या वाहनाला धोकादायक पद्धतीने कट मारला. कॉन्व्हॉयमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला गाडी थांबवण्याचे वारंवार इशारे दिले, तरीही तो बेधडकपणे गाड्यांच्या मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.

अखेर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी शुभम वनीत याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) कलम १८४, १८५ आणि ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विकास काटे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!