Jejuri Devasthan: पुणे महापालिका नोकरी घोटाळा: जेजुरी देवस्थान च्या विश्वस्तासह तिघांना अटक; कोट्यवधींची फसवणूक


देवस्थान चे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता बनसोडे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

देवस्थान चे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यासह दोघांना अटक

पुणे: महानगरपालिकेत (PMC) कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सुशिक्षित तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या हायप्रोफाइल गैरव्यवहारात जेजुरीच्या प्रसिद्ध श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता बनसोडे यांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

न्यायालयाने आरोपी खेडेकरला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या कारवाईमुळे पुणे आणि जेजुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

३ वर्षांत पावणेतीन कोटींचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा गोरखधंदा मे २०२२ ते मे २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालवला गेला.

आरोपींनी १४ हून अधिक सुशिक्षित आणि गरजू तरुणांना पालिकेत मोठ्या पदांवर नोकरीचे आमिष दाखवले.

सरकारी नोकरीच्या मोहापायी अनेक तरुणांनी कर्ज काढून, तर काहींनी दागिने-जमीन गहाण ठेवून लाखो रुपये आरोपींना दिले.

अशा प्रकारे आरोपींनी तरुणांकडून तब्बल २ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बनावट नियुक्तीपत्रे अन् बँक खात्यात खोटा पगार!

तरुणांचा पूर्ण विश्वास बसावा म्हणून या टोळीने बनावटगिरीची हद्द पार केली होती.

पुणे महापालिकेचे खोटे लेटरहेड, बनावट शिक्के आणि बड्या अधिकाऱ्यांच्या हुबेहूब खोट्या सह्यांचा वापर करून उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

इतकेच नाही तर पालिकेची बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका (Service Books), वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या खोट्या पावत्याही (Salary Slips) बनवण्यात आल्या होत्या.

नोकरी खरी असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आरोपी काही महिने उमेदवारांच्या बँक खात्यावर परस्पर पगाराची रक्कम जमा करायचे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

असा झाला भांडाफोड

हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

या प्रकरणात प्रशासनातील आणखी कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा हात आहे? आणि फसवणूक झालेले आणखी काही तरुण आहेत का? याचा सखोल तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!