Jalgaon News | चक्क एसटी ची झाली चोरी.. जामनेर आगारातील प्रकार. पंक्चर होताच रस्त्यात सोडून दिली!


जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी कोरी ‘जिजाऊ’ एसटी मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली

एसटी ची ‘जिजाऊ’ बस मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक

जळगाव : जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या जामनेर आगारातील नवी कोरी ‘जिजाऊ’ बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

एमएच 19 एनई 4214 क्रमांकाची ही एसटी बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाली. त्यानंतर ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर बंद अवस्थेत आढळून आली.

बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने संशयिताने ती तेथेच सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सोमवारी सकाळी शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर एसटी बस उभी असल्याचे दिसले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

जळगाव-नेरी-जामनेर धावणारी सदरची बस जामनेर एसटी आगाराची असल्याचे समोर आले आणि बस पळवून नेल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

एसटी जिजाऊ
एसटी जिजाऊ

आगारातील चालक-वाहकांना पटली ओळख

शहापूर गावात जामनेर एसटी आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. फरशी पुलावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या बसबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बसची पाहणी केल्यानंतर ही बस जामनेर एसटी आगारातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती दिली.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने बस आगारातून बाहेर काढली.

नवी कोरी बस घेऊन संशयिताने जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने प्रवास केला.

मात्र, खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले. त्यानंतर बस पुढे नेता न आल्याने संशयिताने ती तेथेच सोडून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केले.

सीसीटीव्हीत संशयित कैद

पळवून नेलेली नवी कोरी ‘जिजाऊ’ बस जामनेर आगारातून जळगाव-नेरी-जामनेर या मार्गावर नियमित धावत असते. प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी एसटी बस अशा प्रकारे पळवून नेण्यात आल्याने एसटी प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

आगार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित इसम कैद झाल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.

त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

संशयिताने बस नेमकी कोणत्या मार्गाने शहापूरपर्यंत नेली, या मार्गावरील अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्याची हालचाल कैद झाली आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस अज्ञात व्यक्तीने पळवून नेली आणि ती काही किलोमीटर अंतरावर जाऊन सोडून दिली, या घटनेने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बस आगारातून बाहेर जात असताना संबंधित व्यक्तीची कुणालाही चाहूल कशी लागली नाही, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

बस आगारातून बाहेर काढताना सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही, तसेच बसच्या चाव्या संशयिताच्या हाती कशा लागल्या, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

पोलीस तपासातून बस पळविण्यामागील नेमका उद्देश, संशयिताची ओळख आणि त्याने बस शहापूरपर्यंत का नेली, याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!