Jalgaon Crime News | जळगावात ‘एसीबी’ची धडक कारवाई 10 हजार मागून 7 हजार रुपयांची लाच घेणारा एजंट एसीबीच्या ताब्यात!


जळगावात ‘एसीबी’ची धडक कारवाई 10 हजार मागून 7 हजार रुपयांची लाच घेणारा एजंट एसीबीच्या ताब्यात सापडला आहे.

लाच घेणारा एजंट सापडला शोरूम मध्ये

कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी (Permanent Passing) आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने ७ हजार रुपयांची लाच घेणारा एका खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.

योगेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयित एजंटचे नाव आहे.

ही धडक कारवाई सोमवारी जळगावातील इच्छादेवी चौक परिसरातील बजाज टी.व्ही.एस. शोरूम येथे करण्यात आली. या कारवाईमुळे जळगाव आरटीओ वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला मागितली 10 हजारांची लाच

या प्रकरणातील तक्रारदाराला त्यांच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून हवे होते.

आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामांची मध्यस्थी करणाऱ्या संशयित आरोपी योगेश पाटील याने हे काम करून देण्याच्या मोबदल्यात आरटीओचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा असल्याचे सांगत सुरुवातीला तब्बल १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रंगेहाथ तक्रार नोंदवली.

इच्छादेवी चौकात एसीबीचा सापळा

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी जळगावातील इच्छादेवी चौक परिसरात अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला.

दरम्यान, तक्रारदार आणि संशयित आरोपी यांच्यात तडजोड होऊन अखेर ७ हजार रुपये देण्याचे ठरले. इच्छादेवी जवळील बजाज टी.व्ही.एस. शोरूम परिसरात हा व्यवहार निश्चित झाला.

 ठरल्याप्रमाणे जसे तक्रारदाराने ७ हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष संशयित योगेश पाटील याच्या स्वाधीन केली, तसेच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या कारवाईनंतर जळगाव येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात संशयित आरोपी योगेश पाटील याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा खासगी एजंट आरटीओमधील नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी ही लाच गोळा करत होता, याचा कसून तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करत आहे.

शासकीय कामांसाठी कुणीही लाच मागितल्यास नागरिकांनी थेट एसीबीच्या ०२५७-२२३५४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!