कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर घोटाळा: जळगावात गिरीश महाजन यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट-मनसे रस्त्यावर आले आहेत.
गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी
जळगाव येथे गिरीश महाजन यांच्या विरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली झालेल्या कथित बनावट वर्क ऑर्डर घोटाळ्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र आले.
महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत सरकारला जाब विचारला.
591 कोटी रुपयांच्या खोट्या वर्क ऑर्डर
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील विविध कामांसाठी बनावट कार्यारंभ आदेश तयार करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरी आणि अधिकृत शिक्क्यांचा वापर करून सुमारे 591 कोटी रुपयांच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवत ठेकेदारांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे आरोप आहेत.
याच प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
मंत्री महाजन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की आरोपींपैकी एक व्यक्ती त्यांचा दूरचा नातेवाईक असला तरी कोणालाही माफ केले जाणार नाही.
महाजन यांनी स्वतः पोलिस आयुक्त यांना माहिती देऊन कारवाईची मागणी केल्याचे सांगितले होते.
निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशीची मागणी
मात्र विरोधकांना हे स्पष्टीकरण पुरेसे वाटले नाही. आंदोलकांनी ठामपणे सांगितले की, कुंभमेळा विभाग गिरीश महाजन यांच्या अखत्यारीत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
उच्चस्तरीय किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशीचीही मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात साबण आणि सॅनिटायझर घेऊन “पारदर्शकता हवी” असा संदेश दिला.
गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे आणि महिला नेत्या मनीषा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात पारदर्शकता आणण्याची, सार्वजनिक निधीचा योग्य वापर करण्याची आणि गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी एकस्वराने केली.
गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनाचा मुख्य मुद्दा ठरला आहे.
यामुळे जळगावातील राजकीय वातावरण तापले असून गिरीश महाजन यांच्यापुढील प्रतिक्रिया आणि सरकारची पुढील पावले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









