FDA Jalgaon News | जळगावात एफडीए ने केले 5 हॉटेलचे परवाने निलंबित; 500 लिटर दूध नष्ट!


जळगावात एफडीए ची धडक कारवाई; नियम मोडणाऱ्या 5 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 504 लिटर दूषित दूध नष्ट आणि सुमारे 38 लाखांचा गुटखा जप्त

एफडीए ची जिल्ह्यामध्ये व्यापक तपासणी मोहीम

जळगाव जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन एफडीए विभागाने गेल्या काही महिन्यांत व्यापक मोहीम राबवत कठोर कारवाईचा धडाका लावला आहे.

अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, विनापरवाना व्यवसाय आणि प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करत विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकल्या.

या कारवाईत पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, गुटख्याच्या 22 कारवायांमध्ये 28 संशयितांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दूषित दूधाचा मोठा साठा नष्ट केला गेला.

38 लाखांचा गुटखा देखील जप्त

एफडीए च्या या मोहिमेत प्रतिबंधित गुटख्याविरोधात सर्वाधिक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या 22 धाडींमध्ये तब्बल 38 लाख 13 हजार 493 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

या प्रकरणांमध्ये 28 संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

गुटख्याच्या अवैध साठवणूक आणि विक्रीविरोधात विभागाची मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दूध विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठीही मोहीम

गुटख्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या विविध अन्नपदार्थांवरही विभागाने कारवाई केली. प्रिझर्व्ह फूड, तूप, बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल, मिठाई आणि दूध या पदार्थांशी संबंधित 16 प्रकरणांमध्ये 16 लाख 3 हजार 916 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

या नमुन्यांची तपासणी सुरू असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

दूध विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठीही विभागाने विशेष मोहीम राबवली.

तपासणीदरम्यान निकृष्ट आणि दूषित आढळलेल्या 504 लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. या दुधाची अंदाजे किंमत 26 हजार 487 रुपये इतकी असल्याची माहिती विभागाने दिली.

दूषित दूध बाजारात पोहोचण्यापूर्वीच नष्ट केल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा संभाव्य धोका टळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!