Girish Mahajan News | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी गिरीश महाजन काहीच बोलेना


जळगाव शहरा जवळील खचलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांना कथित ऑडिओ क्लिप विषयी विचारले असता ते काहीच बोलले नाही.

पत्रकार मागे, गिरीश महाजन पुढे असे नाट्यमय चित्र

भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी जळगावात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.

जळगाव शहराजवळील खचलेल्या बायपास महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री महाजन यांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारले.

मात्र गिरीश महाजन यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळत पुढे चालत जाणे पसंत केले. परिणामी महाजन पुढे आणि पत्रकार मागे” असे नाट्यमय दृश्य उभे राहिले.

कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता टाळले

विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे निर्माण झालेल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर गिरीश महाजन हे पहिल्यांदाच जळगावात आले होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना चौधरी यांच्या कथित संभाषणाबाबत प्रश्न विचारले.

विशेषतः माजी खासदार डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याविषयी झालेल्या कथित आक्षेपार्ह चर्चेवर महाजन यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु महाजन यांनी कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर न देता पुढे जाणेच पसंत केले.

पक्षाने कारवाई केली आहे

पत्रकारांनी वारंवार प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला असताना  महाजन यांनी केवळ “पक्षाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे” एवढेच म्हटले. त्यानंतर त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

चौधरी हे महिला पदाधिकाऱ्यांबद्दल बोलत असताना  महाजन यांनी त्यांना थांबवले नाही किंवा समर्थन दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे,

याबाबत विचारणा केल्यावरही गिरीश महाजन मौन बाळगले.

विजय चौधरी चा तातडीने घेतला राजीनामा

पहिल्या क्लिपमध्ये डॉ. हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचा आरोप होता.

त्यानंतर  महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची आणखी एक ध्वनिफीत समोर आल्याने वाद चिघळला. या क्लिपमध्ये रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयी चर्चा झाल्याचा दावा आहे.

प्रकरणानंतर भाजपने विजय चौधरी यांचा तातडीने राजीनामा घेतला असला तरी नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण अद्याप तापलेले आहे.

विरोधकांनी महाजन यांनी कथित संभाषणादरम्यान चौधरी यांना रोखले नसल्याचा आरोप केला आहे.

गिरीश महाजन सविस्तर बोलणार का?

या सर्व घडामोडींमुळे जळगावातील बायपास महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी विकासकामांपेक्षा ऑडिओ क्लिप प्रकरणाचीच अधिक चर्चा रंगली.

पत्रकारांच्या प्रश्नांपासून दूर जाण्याचा गिरीश महाजन यांचा प्रयत्न आणि त्यांच्या मागे उत्तरांच्या प्रतीक्षेत धावणारे पत्रकार हेच या दौऱ्याचे सर्वाधिक चर्चेचे दृश्य ठरले.

आता या प्रकरणावर महाजन नव्याने सविस्तर भूमिका मांडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!