Cyber Crime : पुण्यात १.८० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; म्युल अकाउंट पुरवणारे ५ सुशिक्षित तरुण गजाआड


टोळीने केलेल्या सायबर फ्रॉडचा फटका देशभरातील १९ पीडित नागरिकांना बसला असून, तब्बल १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

सायबर फ्रॉडचा फटका देशभरातील १९ पीडित नागरिकांना

पुणे: बनावट बँक खाती (म्यूल अकाउंट्स) उघडून सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या आणि देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पुणे शहर पोलिसांच्या वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह ५ सुशिक्षित तरुणांना अटक केली आहे.

या टोळीने केलेल्या सायबर फ्रॉडचा फटका देशभरातील १९ पीडित नागरिकांना बसला असून, तब्बल १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रवण राजेंद्र अंकुश (वय २५, रा. उरुळी देवाची), हरीओम हरीराम साहू (वय २४, रा. साळुंखे विहार), सौद इदफान शेख (वय २३), साहिल रौफ शेख (वय २५) आणि तालिब नूरमोहम्मद शेख (वय २५, तिघे रा. येरवडा) यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमिशनच्या लालसेने सुशिक्षित तरुण बनले गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा मुख्य सूत्रधार श्रवण अंकुश हा होता.

त्याने त्याचा साथीदार हरीओम साहू याच्या मदतीने इतर तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावे बनावट बँक खाती उघडली.

सायबर गुन्ह्यातून मिळणारे पैसे वळवण्यासाठी (म्यूल अकाउंट म्हणून) या खात्यांचा वापर केला जात होता.

सायबर फसवणुकीचे पैसे खात्यात जमा झाल्यावर प्रत्येक व्यवहारासाठी खातेधारकाला ५,००० रुपये, तर खाते मिळवून देणाऱ्या साहूला प्रति खाते ३,००० रुपये कमिशन दिले जात होते.

असा झाला टोळीचा पर्दाफाश

महाराष्ट्र सायबर विभागाला काही बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार होत असल्याचे आणि हीच खाती अनेक सायबर तक्रारींमध्ये वारंवार समोर येत असल्याचे दिसून आले.

यानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रावून या टोळीचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील पैशातून खरेदी केलेली एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही पैशांच्या किंवा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड किंवा केवायसी (KYC) कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नका.

जर तुमचे खाते सायबर गुन्ह्यासाठी वापरले गेले, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!