Chopra Accident News | तीन ते चार अस्वलांचा मजुरांवर हल्ला, चोपडा तालुक्यातील घटना


चोपडा तालुक्यात तीन ते चार अस्वलांचा मजुरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

अस्वलांचा अचानक हल्ला तरुणासह वृद्ध जखमी

जळगाव : शेतात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक समोर आलेल्या तीन ते चार अस्वलांचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील बडवणी तांडा ते बडाईपाडा परिसरात मंगळवारी (25 ऑगस्ट) दुपारी घडली.

या हल्ल्यात 16 वर्षीय राकेश पावरा आणि 60 वर्षीय नाना पावरा हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अचानक समोर आले अस्वलांचे कळप

मंगळवारी दुपारी काही मजूर शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. याचवेळी अचानक तीन ते चार अस्वलांचा कळप त्यांच्या समोर आला.

अस्वल दिसताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वलांनी राकेश पावरा आणि नाना पावरा यांच्यावर हल्ला केला.

अस्वलांच्या हल्ल्यात दोघांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि इतर मजुरांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.

शेत परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे बडवणी तांडा, बडाईपाडा आणि आसपासच्या शेतशिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही काळापासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतात काम करणाऱ्या नागरिकांना अचानक वन्यप्राणी समोर आल्यास जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून अस्वलांचा माग काढावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान, जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांचे लक्ष आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि मजुरांनी शेतात एकट्याने न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!