चाळीसगाव-जळगाव महामार्गाची दुरवस्था झाली असून प्रशासनाची मात्र केवळ ‘ठिगळबाजी’ सुरू आहे, शिवाय अन इमर्जन्सी यंत्रणा गायब देखील झाली आहे.
चाळीसगाव ते जळगाव महामार्गाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चाळीसगाव ते जळगाव महामार्गाची दुरवस्था आणि प्रशासकीय निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी महाकाय भेगा पडल्या आहेत. या भेगा बुजवण्यासाठी आता सिमेंट-काँक्रीटची ‘ठिगळबाजी’ सुरू आहे.
तर दुसरीकडे, आपत्कालीन मदतीसाठी उभारण्यात आलेली ‘इमर्जन्सी टेलिफोन’ यंत्रणा गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून गायब असूनही ती पूर्ववत करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
कोट्यवधींची यंत्रणा चोरीला; अधिकारी सुस्त
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज हजारो नागरिक याच मार्गाने प्रवास करतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बसवलेले इमर्जन्सी टेलिफोन चोरीला गेले आहेत. या चोरीनंतर केवळ एफआयआर (FIR) नोंदवून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री तक्रारी केल्या असून ही यंत्रणा पूर्ववत करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे प्रवासादरम्यान अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यावी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
तसेच, रस्त्याला पडलेल्या भेगांवर काँक्रीट टाकून मूळ रस्ता दणकट करण्याऐजी केवळ ‘मलमपट्टी’ का केली जात आहे? असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अधिकारी काय म्हणतात?
“इमर्जन्सी टेलिफोन ज्या ज्या भागातून चोरीला गेले आहेत, त्या त्या स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार आणि एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे.”
— राहुल पोद्दार (NHAI विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे)
नागरिकांमध्ये तीव्र संताप
तक्रार दाखल करून महिने उलटले तरी यंत्रणा पुन्हा उभी न करणे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार दाखवतो.
सुरक्षेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने एखादा गंभीर अपघात झाल्यास प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
केवळ एफआयआरचा कागद दाखवून अधिकारी आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत; प्रशासनाने तात्काळ नवीन टेलिफोन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी तीव्र मागणी आता प्रवाशांमधून केली जात आहे.









