पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती चा लाभ मिळालेला नाही.
कर्जमुक्ती लाभ मिळण्यात का येत आहेत अडचणी
जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लाभ सुरू; उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुरूच, तर पिक विमा नोंदणीसाठीही विशेष लक्ष आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण 87 हजार 826 कर्जखात्यांपैकी 65 हजार 343 कर्जखाती योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
प्रत्यक्षात, 31 हजार 908 पात्र शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
त्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच पुढील टप्प्यात लाभ दिला जाईल.
आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया
योजनेला 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे योजना जाहीर करण्यात आली.
योजनेच्या निकषांमध्ये 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार काही अंशतः सुधारणा करण्यात आल्या. पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची पहिली यादी 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार, 7 ऑगस्ट 2026 अखेर जळगाव जिल्ह्यातील 50 हजार 515 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
31908 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ
जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात 31908 हजार ९०८ शेतकऱ्यांसाठी 184 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा निधी संबंधित बँकांच्या पूल खात्यात जमा करण्यात आला.
आता बँकांकडून लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यावरही योजनेचा लाभ वर्ग करण्यात येणार आहे.
त्यामुळे पात्र असूनही पहिल्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
खरीप पीक कर्ज व पिक विमा याबाबत निर्देश
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील शेती हंगामासाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष कॅम्प आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार या संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय समितीची बैठक
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पच्या नियोजनाबाबत 10 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
याचवेळी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्याबाबतही आवाहन करण्यात येत असून, खरीप हंगामातील जोखीम कमी करण्यासाठी पिक विमा नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळेल. आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी. पिक विमा संबंधित अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलशी संपर्क साधा.









