Pune crime News: रविवार पेठेत सव्वादोन कोटींची घरफोडी करणाऱ्या काका-पुतण्याला अवघ्या १२ तासांत अटक; २ किलोहून अधिक सोने जप्त


२ कोटी २० लाख रुपयांची मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आणि खडक पोलिसांना अवघ्या १२ तासांत मोठे यश आले आहे.

घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी 12 तासात पकडले

पुणे: पुण्यातील रविवार पेठ भागात एका सराफाच्या घरात झालेली २ कोटी २० लाख रुपयांची मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आणि खडक पोलिसांना अवघ्या १२ तासांत मोठे यश आले आहे.

या हाय-प्रोफाइल चोरी प्रकरणात पोलिसांनी काका आणि पुतण्याच्या जोडीला बेड्या ठोकल्या आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपींची नावे आणि अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैनूद्दीन शेख (वय २२) अशी असून दोघेही रविवार पेठ येथील काच आळी भागात राहणारे आहेत.

नेमकी घटना काय?

रविवार पेठेत राहणारे फिर्यादी मोहम्मद तौफिक रज्जाक खान (वय ३६) हे व्यवसायाने सराफ (सुवर्णकार) आहेत.

शनिवार, १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.०० ते रात्री ८.१५ च्या सुमारास ते आपल्या पत्नीसह काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते.

हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाटाचे लॉकर उघडून चोरट्यांनी तब्बल २.२ किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे लंपास केली, ज्यांची बाजारभावानुसार किंमत २ कोटी २० लाख रुपये इतकी होती.

पोलिसांचा तपास आणि कारवाई

घर फिरून आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच खान यांनी तात्काळ खडक पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिसांचे विशेष तपास पथक तात्काळ रवाना करण्यात आले.

तपास पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली.

यादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित मुस्तफा आणि सरफराज यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

१००% मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींच्या घरातून चोरीला गेलेले सर्वच्या सर्व २ किलो २४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे (एकूण मूल्य २.२४ कोटी रुपये) अवघ्या १२ तासांच्या आत जप्त केले आहेत.

गुन्हा घडल्यापासून अत्यंत कमी वेळात एवढी मोठी रिकव्हरी केल्यामुळे पुणे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!