पुण्यात शारदीय नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून सर्व मंदिरे देखील सजली आहेत. नवरात्रोत्सवाचे नियोजन असे आहे.
पुण्यात शारदीय नवरात्रोत्सवासाठी देवी मंदिरे सजली
पुणे: पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी देवी यांसह शहरातील प्रमुख देवी मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह असून उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
रविवार, ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात घटस्थापना, महापूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार आहे.
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व दर्शनाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मंदिरांमधील उत्सवाचे वेळापत्रक
श्री चतु:शृंगी देवी मंदिर (११ ते २० ऑक्टोबर): रविवारी सकाळी ९ वाजता श्रीधर अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होईल. दररोज सकाळी १० आणि रात्री ८ वाजता महाआरती होईल. १७ ऑक्टोबरला ‘आजीबाईंचा भोंडला’, तर २० ऑक्टोबरला नवचंडी होम व पालखी मिरवणूक निघेल. मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन लिफ्ट, ऑनलाइन पास आणि विनामूल्य वाहनतळाची सोय आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर: पुण्याची ग्रामदेवता असलेल्या या मंदिरात रविवारी सकाळी ७ वाजता घटस्थापना होईल. उत्सवकाळात मंदिर सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत दर्शनासाठी खुले राहील.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग (११ ते २० ऑक्टोबर): रविवारी सकाळी ९ वाजता श्रीकांत व सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होईल. सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन होईल. यंदा देवीला २ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट परिधान केला जाणार असून ‘शृंगार’ संकल्पनेवर आधारित सजावट असेल.
श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ (११ ते २५ ऑक्टोबर): रविवारी सकाळी ११ वाजता घटस्थापना व महाअभिषेक होईल. १९ ऑक्टोबरला नवचंडी हवन, २० ऑक्टोबरला शस्त्रपूजन आणि २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महापूजा होईल.
तळजाई व वनदेवी मंदिर: दोन्ही मंदिरात रविवारी सकाळी ८:३० ते ११ या वेळेत घटस्थापनेची मिरवणूक निघेल आणि ११:३० ते १ या वेळेत महापूजा व घटस्थापना होईल. उत्सवकाळात मंदिर दिवसभर खुले राहील.
श्री काळी जोगेश्वरी मंदिर, बुधवार पेठ: येथे पारंपरिक पद्धतीने सप्तशती पाठ, श्रीसूक्त पठण आणि जोगवा या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच मंदिरांमध्ये सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग आणि वैद्यकीय मदतीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.









