अभिनयाने आणि संवेदनशील स्वभावाने करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर गुरुवारी रात्री त्यांच्या लाडक्या मातीत विलीन झाले.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
पुणे: आपल्या दमदार अभिनयाने आणि संवेदनशील स्वभावाने करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर गुरुवारी रात्री त्यांच्या लाडक्या मातीत अनंत प्रवासासाठी विलीन झाले.
पुणे जिल्ह्यातील डोणजे गावातील ‘नानाची वाडी’ या त्यांच्या आवडत्या शेतात रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयुष्यभर मातीशी आणि सामान्य माणसाशी घट्ट नातं जपणाऱ्या नानांच्या जाण्याने संपूर्ण सिंहगड घेरा परिसर आणि डोणजे गाव एका गडद शोकात बुडून गेले होते.
रेखाचित्र पाहून नीलकांती आणि मल्हार गहिवरले
नाना पाटेकर यांच्या निधनाने त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नाना नवख्या कलाकारांच्या कलेचे नेहमीच मनापासून कौतुक करायचे. त्यांच्या अंत्यविधीला अशीच एक नवखी कलावंत तरुणी नानांचे सुंदर रेखाचित्र घेऊन आली होती.
तिने ते रेखाचित्र आधी नानांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांना दाखवले, तेव्हा ते पाहून मल्हार नतमस्तक झाले आणि त्यांनी तिचे आभार मानले.
त्यानंतर जेव्हा तिने ते चित्र नानांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांना दाखवले, तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी अत्यंत मायेने त्या तरुणीच्या गालाला हात लावून तिचे आभार व्यक्त केले.
हा भावनिक क्षण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय हेलावून गेला.
मुख्यमंत्र्यांची विमानतळावर श्रद्धांजली
नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यातून विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले.
पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. “भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भारदस्त आणि संवेदनशील चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा धडा घालून दिला,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
त्यानंतर ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे नानांचे पार्थिव रात्री ९ वाजता डोणजे येथील ‘नानाची वाडी’ येथे आणण्यात आले. आपल्या लाडक्या अभिनेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दिग्गजांची उपस्थिती
नानांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, तसेच अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार आणि गौरव मोरे आदींनी नानांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.









