Divya Aagar News : दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुण्याच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तातडीच्या मदतीचे निर्देश


पुण्याच्या आळंदी परिसरातील एका खासगी अकॅडमीचे आठ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

रायगड: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या आळंदी परिसरातील एका खासगी अकॅडमीचे आठ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या दुर्घटनेची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने सर्वतोपरी प्रशासकीय व आवश्यक मदत पुरवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरातील एका खासगी अकॅडमीच्या इयत्ता ११ वी आणि १२ वी सायन्सचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेत असताना यातील काही मुले पाण्यात उतरली.

आठ विद्यार्थी पाण्याच्या जोरदार प्रवाहात खोलवर वाहून गेले

मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे आठ विद्यार्थी पाण्याच्या जोरदार प्रवाहात खोलवर वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम राबवली.

दुर्दैवाने, या शोधमोहिमेदरम्यान आठही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

ऐन तारुण्यात आठ विद्यार्थ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण आळंदी परिसर आणि पुणे शहरावर शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आदेश

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन नारायणराव जावळे आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधला.

त्यांनी घटनास्थळावरील सद्यस्थितीचा आढावा घेत बचाव व मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली.

तसेच, पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने परस्पर समन्वय ठेवून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

यासोबतच मृतदेहांचे शवविच्छेदन, कायदेशीर व वैद्यकीय सोपस्कार युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सध्या पुण्याचे जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक महसूल व पोलीस दल घटनास्थळी ठाण मांडून पुढील प्रक्रिया गतिमान करत आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!