पुण्यात १८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
खुनाच्या आरोपीला पोलिसांनी वडगाव मध्ये पकडले
पुणे: दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाची सिमेंटचे ब्लॉक आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या खळबळजनक खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रेम महेश जगताप (वय २२, रा. तुकाई दर्शन, वडगाव, पुणे) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
किरकोळ भांडणातून थरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात ही घटना घडली होती.
मृत नयन सचिन जाधव (वय १८, रा. शिवकृपा अपार्टमेंट, आंबेगाव पठार, पुणे) याचे दोन दिवसांपूर्वी एका विधीसंघर्षीत बालकासोबत (नाबालिग) भांडण झाले होते.
याच रागातून संबंधित अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदारांच्या मदतीने नयनवर लोखंडी धारदार हत्याराने वार केले, तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून त्याचा जागीच खून केला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली आरोपीला अटक
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी प्रेम जगताप हा फरार होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनव चौधरी आणि सोहम शेंडकर हे आरोपीचा शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी प्रेम जगताप हा तुकाईनगर (हिंगणे, वडगाव) परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
तपास पथकाने तात्काळ या परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव करत आहेत.
कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची कामगिरी पुणे शहराचे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, आणि उपनिरीक्षक अण्णा दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांचा समावेश होता.









