महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्येक कामकाजाच्या दिवशी आपल्या भागाची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेचे सर्व कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उतरणार रस्त्यावर
पुणे: शहरातील नागरी समस्यांकडे केवळ कागदावरून पाहण्याऐवजी आता महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळच्या सत्रात आपल्या भागाची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतचे थेट आदेश जारी केले आहेत.
कोणत्या गोष्टींची पाहणी करणार
या पाहणीदरम्यान रस्त्यांची अवस्था, नाले, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या शोधून त्यांची नोंद करावी लागणार आहे.
स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या समस्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यामुळे नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी महापालिका कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
फोटो अन् व्हिडिओ पुरावे बंधनकारक
एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी मुख्यालयाची मंजुरी किंवा अतिरिक्त साधनांची गरज असल्यास, त्याची माहिती संबंधित विभागप्रमुखांना तातडीने देणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, समस्या सोडविण्यापूर्वीचा आणि सोडवल्यानंतरचा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे.
तसेच, प्रत्येक आठवड्यात केलेल्या पाहणीचा आणि कार्यवाहीचा अहवाल दर शुक्रवारी आयुक्तांकडे सादर करावा लागेल.
यासाठी अधिकाऱ्यांना दर आठवड्याला स्वतंत्र ‘गुगल शीट’ भरावी लागणार आहे.
कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दर सोमवारी सकाळी आढावा बैठक घेणार आहेत.
या बैठकीला संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या या आदेशांचे पालन न करणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला आहे.









