Jalgaon Dog News | जळगावात मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; माहिती अधिकारातून गैरव्यवहार उघड


जळगावात मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती उघड झाली असल्यामुळे जळगाव मध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या प्रकरणाची चौकशी करा

जळगाव: जळगाव शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आणि त्यांच्या निर्बीजीकरण प्रक्रियेत झालेला कथित कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आता चव्हाट्यावर आला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन हसन खान यांनी अनोख्या वेशभूषेत आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.

कुत्र्याच्या चाव्यानंतर लागला शोध

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हुसेन खान यांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला होता.

या घटनेनंतर त्यांनी शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त कसा केला जातो, याची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारात (RTI) कागदपत्रे मागवली. आरटीआयमधून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती.

जळगाव शहरात सुमारे १८ हजार मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबवल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही मोहीम केवळ कागदावरच राबवून शासकीय निधीचा मोठा अपहार केल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार

हुसेन खान यांच्या दाव्यानुसार, निर्बीजीकरणाच्या नावाखाली संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार संस्थांनी संगनमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केला आहे. प्रत्यक्षात शहरातील कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही, उलट मोकाट कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच आहे. लहान मुले, वृद्ध आणि वाहनचालकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत.

अनोखे आंदोलन आणि मागण्या

या कथित घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी हुसेन खान यांनी अंगावर कुत्र्यांचे मुखवटे आणि फलक लावून महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले.

“कागदोपत्री निर्बीजीकरण करणारे कुत्रे कुठे गेले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी दोषी असलेले महापालिका अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, शहरातील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि निर्बीजीकरण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे जळगाव महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!