तुळशीबाग गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून यंदा साकारणार भव्य ‘ब्रह्मणस्पती मंदिर’ साकारण्यात येणार आहे.
मानाचा चौथा गणपती उत्सवाचे आकर्षण भव्य मंदिर
पुणे: पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण भव्य ब्रह्मणस्पती मंदिर असणार आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये आणि सजावट
- भव्य रचना: हे मंदिर सुमारे ३२ फूट रुंद, ३५ फूट उंच आणि १०० फूट लांब आहे.
- कलाकुसर: मंदिराच्या रचनेत १० आकर्षक खांब असून, प्रत्येक खांबावर गजरूढ (हत्तीवर स्वार) शिल्पांची सुंदर मांडणी आहे. यात भव्य गर्भगृह, आकर्षक कमानी आणि पारंपरिक वास्तुकलेचा मिलाफ पाहायला मिळेल.
- संकल्पना व रोषणाई: मंदिराची सजावट सरपाले बंधू यांच्या संकल्पनेतून साकारली आहे, तर काची बंधू यांनी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी मंदिराचे सौंदर्य अधिक खुलवणार आहे.
- विशेष सुविधा: पुण्यात पहिल्यांदाच भाविकांना श्रींच्या चरणस्पर्शाचा लाभ घेता येणार आहे, यासाठी मंडळाने विशेष व्यवस्था केली आहे.
प्रमुख सोहळे आणि धार्मिक कार्यक्रम
श्रींचे आगमन (रविवार, १३ सप्टेंबर २०२६): उत्सव मंडपात श्रींचा आगमन सोहळा प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन आणि सौ. जान्हवी बालन यांच्या हस्ते संपन्न होईल.
प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक (सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ – सकाळी ९:०० वाजता):
मिरवणूक मार्ग: गणपती चौक, लक्ष्मी रोड, नगरकर तालीम चौक, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी गणपती, मजूर अड्डा चौक, दगडूशेठ, समाधान चौक, लक्ष्मी रोड, गणपती चौक ते उत्सव मंडप.
प्राणप्रतिष्ठापना सोहळा (सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ – दुपारी १२:३० वाजता): श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (अयोध्या) चे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल.
उत्सवादरम्यान अभिषेक, गणेश याग, मंत्रजागर आणि सत्यविनायक पूजा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पुणेकरांसह राज्यातील सर्व गणेशभक्तांनी दर्शनाचा व चरणस्पर्शाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाने केले आहे.









