Pune Police Action : भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्टलसह गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद


भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्टलसह गोळीबार करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणे: बेकायदेशीर पिस्टल बाळगून निष्काळजीपणे गोळीबार करणाऱ्या आणि एकाला गंभीर जखमी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

संकेत गोरक्ष चोरघे (वय ३०, रा. कोळवडी, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे.

मित्रांच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकात ही घटना घडली होती.

आरोपी संकेत चोरघे याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती त्याचे मित्र सनी उर्फ संदीप सुभाष दीपक आणि अविनाश मोरे यांना होती.

मात्र, त्यांनी ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली आणि उलट ते पिस्टल स्वतः हाताळले. त्यानंतर संकेत चोरघे याने स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही ते पिस्टल अत्यंत निष्काळजीपणे हाताळले.

यादरम्यान पिस्टलधून सुटलेली गोळी त्याचा मित्र सनी उर्फ संदीप दीपक याच्या मांडीत लागली. यात सनी गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी गदा चौकात रचला सापळा

गुन्हा घडल्यापासून आरोपी संकेत चोरघे पिस्टलसह फरार झाला होता.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अविनाश पवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर यांचे पथक त्याचा शोध घेत होते.

तपास सुरू असतानाच, आरोपी संकेत चोरघे हा गदा चौकाजवळील सर्व्हिस रोडवर थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ त्या भागात धाव घेत सर्व्हिस रोडजवळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संकेत चोरघेला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत गुन्ह्यात वापरलेले पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले असून, पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!