Pune Khandani Crime: पुण्यात खाजगी कंपनीकडे ५ कोटींच्या खंडणीची मागणी; २५ लाख घेताना चौघांना रंगेहाथ अटक


कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

खंडणी मागणाऱ्या आरोपींना पथकाने सापळा रचून केली अटक

पुणे: एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.

गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार, प्रत्यक्ष खंडणी मागणारे तसेच आरोपींना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींची भूमिका तपासून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी रचला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी परिसरातील एका खाजगी कंपनीच्या व्यक्तीला आरोपींनी ‘तुमच्या कंपनीची गोपनीय कागदपत्रे आमच्याकडे आहेत’ असे सांगत धमकावले होते.

ही कागदपत्रे सार्वजनिक न करण्यासाठी तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

तडजोडीअंती खंडणीच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २५ लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी आले होते.

मात्र, खंडणीविरोधी पथकाने आधीच सापळा रचून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

  • राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८)
  • अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ४३)
  • रमेश भिमा मांजरेकर (वय ३९)
  • सुनील राजेंद्र कानू (वय ३४)

या कारवाईदरम्यान आरोपी सुनील कानू याला त्याच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध आणि खंडणीच्या कटामागील मुख्य कारणांचा तपास पोलीस करत आहेत.

औद्योगिक क्षेत्रात खंडणीखोरीला थारा नाही” – पोलीस आयुक्त

औद्योगिक परिसरातील कोणत्याही उद्योजक, व्यावसायिक किंवा आस्थापनावर दबाव आणून पैसे मागणे, धमकी देणे, दहशत निर्माण करणे अथवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करणे कदापि सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.

अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) धोरण स्वीकारले असून, दोषींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

“औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. उद्योजक आणि व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.”

         — पिंपरी-चिंचवड पोलीस

नागरिकांना आणि उद्योजकांना आवाहन

खंडणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव किंवा पैशांची मागणी झाल्यास घाबरून न जाता नागरिकांनी तात्काळ खंडणीविरोधी पथक किंवा गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.

खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा हेल्पलाईन क्रमांक: ७५१७-७५१७-५९

ही धडक कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीकुमार महादेवकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!