Pune Student Death : पुण्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; कात्रजमध्ये MBBS च्या विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी, तर नारायण पेठेत MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या


कात्रजमध्ये MBBS च्या विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी, तर नारायण पेठेत MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ

पुणे: शहरात एकाच दिवशी दोन तरुण विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

कात्रज परिसरात एका २१ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.

तर दुसरीकडे नारायण पेठ भागात स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

या दोन्ही घटनांमुळे शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

MBBS च्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

कात्रज परिसरात घडलेल्या पहिल्या घटनेत, माया रेड्डी (वय २१) असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची हैदराबादची रहिवासी होती.

माया ही पुण्यातील नामांकित भारती विद्यापीठात ‘एमबीबीएस’च्या (MBBS) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कात्रज भागातील नॅन्सी लेक होम या निवासी संकुलात राहत होती.

दुपारी एकच्या सुमारास मायाने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

खाली कोसळल्याने झालेल्या गंभीर दुखापतींमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

अभ्यासाचा मानसिक ताण, कौटुंबिक अडचण की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मायाच्या अचानक जाण्याने तिच्या वर्गमित्रांमध्ये आणि विद्यापीठ परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दुसऱ्या घटनेत, नारायण पेठ भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५, मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रथमेश गेल्या दीड-दोन वर्षांपासून पुण्यात राहून MPSC ची तयारी करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड आर्थिक अडचणीत होता.

पुण्यातील राहण्याचा-खाण्याचा खर्च आणि अभ्यासाचा ताण वाढत असल्याने त्याने ओळखीच्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते.

त्याच्यावर जवळपास अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. त्यातच खोलीचे भाडे थकल्यामुळे तो हवालदिल झाला होता.

या आर्थिक कोंडीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परत जाण्याचा विचारही मित्रांजवळ बोलून दाखवला होता. अखेर नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस सध्या मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!