Pune News | विद्यानंद बापट यांच्यावर रचलेले रॅप सॉन्ग तुफान व्हायरल


सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांच्यावर आधारित एक रॅप सॉन्ग तुफान व्हायरल होत आहे.

विद्यानंद बापट यांच्यावर रचलेले रॅप सॉन्ग सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विद्यानंद बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

गणेशोत्सवातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराला तीव्र विरोध करत त्यांनी सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात वातावरण तापवले आहे.

या भूमिकेमुळे त्यांना काही समाजकंटकांकडून मारहाणही सहन करावी लागली, तरीही ते आपल्या विचारांवर पूर्णपणे ठाम राहिले आहेत.

त्यांच्या या लढ्याला समाजातील एका मोठ्या वर्गाने पाठिंबा दिला असला तरी, काहींनी त्यांच्यावर जोरदार निषेधही व्यक्त केला आहे.

अशातच, सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांच्यावर आधारित एक रॅप सॉन्ग तुफान व्हायरल होत आहे.

अवधूत गुप्ते यांनीही लिहिले एक खास गाणे

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ एक खास गाणे तयार केले होते, ज्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.

आता मात्र त्यांच्या अस्खलित मराठी आणि डीजेविरोधी भूमिकेवर एक नवीन रॅप सॉन्ग समोर आले आहे.

‘ओ बापट… जाऊ द्या ना’ असे या गाण्याचे बोल असून, त्यात बापट यांनी माध्यमांशी बोलताना उल्लेख केलेले ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम्…’ हे संस्कृत सुभाषितही चतुराईने समाविष्ट करण्यात आले आहे.

कोणी तयार केले हे गाणे?

दुबई येथील त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक सागर पाटील या तरुणाने हे रॅप सॉन्ग तयार केले आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर आधारित हे गाणे अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

विद्यानंद बापट केवळ त्यांच्या डीजेविरोधी मागणीमुळेच नव्हे, तर त्यांच्या सुसंस्कृत आणि अस्खलित मराठी भाषेमुळेही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

अवधूत गुप्ते यांनी तयार केलेला व्हिडिओ आणि सागर पाटील यांचे रॅप सॉन्ग नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विद्यानंद बापट यांच्याच नावाची लाट असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले आहेत.

गणेशोत्सवात वाजणाऱ्या डीजेविरोधात त्यांनी पुकारलेल्या एल्गाराची गांभीर्याने दखल घेत त्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्यानंतर नवरात्रीसह अनेक सण येत आहेत.

अशा काळात डीजेचा वापर करण्याला बापट यांनी प्रखर विरोध दर्शवल्यामुळे, आगामी काळात या मुद्द्यावरून वादाचा दणदणाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!