पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता की महापालिकेचा ‘मृत्यूचा सापळा’? २१ निष्पापांचे बळी; निष्क्रिय प्रशासनाला कधी जाग येणार?
मृत्यूचा सापळा बनला हा रस्ता प्रशासनाला कधी जाग येणार?
दहा वर्षांपूर्वी केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा नारळ घाईघाईत फोडला गेला.
प्रत्यक्ष जागा ताब्यात नसताना कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण रस्ता अजूनही सलग झालेला नाही.
या केवळ साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर रोज सामान्य पुणेकर घराबाहेर पडताना ‘जिवंत परत येऊ का?’ अशा भीतीने जगत आहेत.
गेल्या साडेचार वर्षांत येथे तब्बल ५१ भीषण अपघात झाले असून, आतापर्यंत २१ निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे.
नुकताच सिल्व्हर ओक सोसायटीसमोर डंपरच्या चाकाखाली चिरडून एका १५ वर्षांच्या दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा झालेला दुर्दैवी अंत ही केवळ दुर्घटना नसून, पुणे महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नियोजनशून्य व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खूनच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी
मूळ ८४ मीटरचा आराखडा गुंडाळून तो ५० मीटरवर आणला गेला. तरीही दहा मिळकतींचे भूसंपादन गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत अडकले आहे.
मार्च २०२७ ची नवी ‘डेडलाइन’ कागदावर जाहीर करणाऱ्या महापालिकेला रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विजेचे महाकाय खांब हटवण्याचीही साधी अक्कल सुचलेली नाही.
मनमानी पद्धतीने यू-टर्न
कात्रज चौक ते राजस सोसायटीदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे कपिलअमृत डेअरीजवळ मनमानी पद्धतीने यू-टर्न काढण्यात आला आहे.
कात्रज तलावाजवळून पालिकेचीच अवजड कचऱ्याची वाहने आणि माउलीनगरकडून येणारे चालक सर्रास उलट्या दिशेने वाहने घुसवतात.
रोज ५० वाहतूक वॉर्डन नियुक्त केल्याचा कागदी दावा करणाऱ्या प्रशासनाला रस्त्यावर प्रत्यक्षात एकही वॉर्डन नियंत्रणासाठी उतरवता येत नाही.
डांबराचा लवलेश नसलेले खड्डे
एका बाजूला खोदकाम, दुसऱ्या बाजूला वाहनांची तुंबलेली गर्दी आणि मधोमध डांबराचा लवलेश नसलेले मोठे-मोठे खड्डे – अशा नरकयातनांतून शाळकरी मुलांना रस्ता ओलांडावा लागतो.
पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गिका नाहीत, पथदिव्यांचा बोजवारा उडाला आहे.
तरीही स्थानिक आमदार, आजी-माजी नगरसेवक आणि प्रशासकीय धुरीण मूक गिळून गप्प बसले आहेत.
सामान्य करदात्यांच्या जीवाशी खेळ
दंड वसुलीसाठी कात्रज चौकात टपून बसणाऱ्या वाहतूक विभागाला या रस्त्यावरील जीवघेणी अनागोंदी दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
विविध विभागांतील समन्वयाचा अभाव आणि ठेकेदारांचे लाड पुरवण्याच्या नादात सामान्य करदात्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
‘दौरे आणि घोषणा’ बंद करून हा रस्ता तत्काळ सुरक्षित करणार? की आणखी निष्पापांचे बळी जाण्याची वाट पाहणार? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.









