एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे उत्साहात पडला यावेळी सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
एकनाथ खडसे यांच्या सोहळ्याला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती
मुक्ताईनगर : ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आयोजित अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे, या सोहळ्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार होते.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, रोहिणीताई खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, मान्यवर आणि खडसे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे खडसे परिवार आणि लोकनेते एकनाथराव खडसे अमृत महोत्सव समितीतर्फे संत मुक्ताईची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आमदार एकनाथराव खडसे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या
यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी नाथाभाऊंनी अविरत मेहनत घेतल्याचे सांगितले. विधानसभेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम कसे करावे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक अशक्य वाटणाऱ्या सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या, असेही पाटील म्हणाले.
पक्षाला निष्ठेने योगदान दिले
संपूर्ण महाराष्ट्रात माणसे जोडणाऱ्या नाथाभाऊंनी ज्या पक्षात काम केले, त्या पक्षाला निष्ठेने योगदान दिले. पुढे राजकीय मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाचा आणि संघर्षाचा गौरव केला. नाथाभाऊ हे सरकारवर जोरदार हल्ला चढवणारे आक्रमक आणि संघर्षशील नेते असून, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचा परिचय आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.
१९९० मध्ये आपण दोघेही प्रथमच विधानसभेत एकत्र निवडून आलो, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. आपण विधानसभेचे अध्यक्ष असताना खडसे विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत असत, असेही वळसे-पाटील यांनी नमूद केले.
रक्षाताई खडसे आणि रोहिणीताई खडसे पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाल्याचा उल्लेख करत त्यांनी नाथाभाऊंनी शरद पवार यांचा आदर्श समोर ठेवावा आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव सोहळा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा गौरव करणारा सोहळा ठरला.









