कुविख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सुरज ठोंबरे टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
पुणे : कुविख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीने संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तसेच दहशत निर्माण करून बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
२३ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत गुजरवाडी-कात्रज आणि शिवाजीनगर परिसरात सुरज ठोंबरे व त्याच्या टोळीतील साथीदारांनी कथितरित्या फौजदारी कट रचला. आंदेकर टोळीतील सदस्यांनी आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची केलेली हत्या तसेच अक्षय म्हस्के याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
कुरोळी-चाकणपर्यंत वाहन ताफ्याची रेकी
२६ जुलै रोजी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांना शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात धुळे व नंदुरबार येथे घेऊन जात असताना त्यांच्या वाहन ताफ्याची रेकी करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेदांत रोहित सावंत, अथर्व दत्तात्रय खोपडे आणि धिरज लखारा यांनी मानव ढमाले याच्या सांगण्यावरून संगनमत केले.
अथर्व खोपडे याच्याकडे असलेल्या अग्निशस्त्रासह अॅक्टिव्हा दुचाकीवरून शिवाजीनगर न्यायालयापासून कुरोळी-चाकणपर्यंत वाहन ताफ्याची रेकी करण्यात आली. ताफा कुठे आहे, त्याच्यासोबत किती पोलीस बंदोबस्त आहे आणि तो कोणत्या मार्गाने प्रवास करीत आहे, याची माहिती फोनद्वारे सुरज ठोंबरे याला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता कलम ५५, ६१(१), सह ३(५), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार २७ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान वेदांत रोहित सावंत (वय २१), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१) आणि धिरज लखारा यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुरज अशोक ठोंबरे (वय २४) आणि मानव शरद ढमाले (वय २४) हे पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग
पोलिसांच्या तपासानुसार, या आरोपींनी प्रत्येक गुन्ह्यात काही समान तर काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन संघटित टोळी तयार केली.
खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्राच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, मारामारी, दहशत निर्माण करणे, फौजदारी कट रचणे आणि बेकायदेशीर जमाव जमविणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिला हा प्रस्ताव
आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि संघटित पद्धतीने दहशत निर्माण करून बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने गुन्हे केल्याचे दिसून आल्याने, या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्शन गायकवाड यांनी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर, मिलिंद मोहिते यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्याकडे सादर केला होता.
मकोका अंतर्गत केली कारवाई
या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर २६ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित गुन्ह्यात मकोका कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे हे करीत आहेत.
ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल आणि सचिन सरपाले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.









