वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करून नंतर खून करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे.
जन्मठेप शिक्षा जळगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
जळगाव: वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करून, तिने विरोध केल्यामुळे गळा आवळून तिची हत्या करणाऱ्या नराधम दीराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या धक्कादायक खटल्यामध्ये न्यायालयाने मुख्य आरोपी दीर प्रवीण छगन बैरागी (वय २६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) याला जन्मठेप सुनावली आहे.
तसेच, या गुन्ह्यात मुलाला मदत करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मृत विवाहितेची सासू लीलाबाई बैरागी हिला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत आणि तपासादरम्यान पोलीस पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
काय आहे संपूर्ण घटना?
हे मन सुन्न करणारे प्रकरण 3 जुलै 2018 रोजी चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे घडले होते.
मृत महिलेचे पती हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कार्यरत असून ते नोकरीनिमित्त चेन्नई येथे तैनात होते.
यामुळे पीडित महिला आपल्या लहान मुलीसह गावातील घरी सासू लीलाबाई आणि दीर प्रवीण यांच्यासोबत राहत होती.
घटनेच्या रात्री महिला मुलीसह झोपलेली असताना, नराधम दीर प्रवीण बैरागी याने तिच्या खोलीत प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
विरोध केल्याने गळा आवळला, सासूने रचला बनाव
पीडित वहिनीने आपली अब्रू वाचवण्यासाठी प्रवीणला तीव्र विरोध केला. या विरोधामुळे संतप्त झालेल्या प्रवीणने तिचा जागीच गळा आवळून निर्घृण खून केला.
हा गंभीर गुन्हा लपवण्यासाठी सासू लीलाबाई बैरागी हिने आपल्या मुलाची पाठराखण केली.
तिने पोलिसांना खोटी माहिती देत सुनेने आत्महत्या केल्याचा बनाव रचला आणि घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस तपास आणि न्यायालयाचा कठोर न्याय
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे संशयित आत्महत्येचा बनाव उधळवून लावला.
खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलेले साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी पूर्णपणे ग्राह्य धरले.
पोलीस पैरवी अधिकारी अमोल पाटील यांच्या चोख कामगिरीमुळे गुन्हेगारांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून देण्यात यश आले.
न्यायालयाने आरोपी प्रवीणला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व २०,२०० रुपये दंड, बलात्काराच्या प्रयत्नासाठी ५ वर्षे सक्तमजुरी आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल ३ वर्षे सक्तमजुरी सुनावली आहे.
तसेच सासू लीलाबाई हिला देखील ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे. या निकालामुळे नातेसंबंधांना काळीमा फासणाऱ्या प्रवृत्तींना मोठा जरब बसला आहे.









