Pune Crime News | पुणे हादरले ! जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आरोपीला अटक


जुन्नर तालुक्यात 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या;  नराधम शेजाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

शेजाऱ्यांनेच केला चिमुकलीवर अत्याचार

जुन्नर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना मंगळवारी (18 ऑगस्ट 2026) दुपारी घडली.

याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार

पीडित मुलगी शाळकरी असून, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ती घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या साहिल संपत खैरे (वय २५) याच्यावर संशय बळावला.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला सायकलवर बसवून पिंपळवंडी गावठाण परिसरातील उसाच्या शेतात नेल्याचा आरोप आहे.

तेथे तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांसोबत शोध घेण्याचे नाटक

घटना घडल्यानंतर आरोपी गावात परतला आणि मुलगी बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर तो पोलीस व ग्रामस्थांसोबत तिचा शोध घेण्यात सहभागी झाला.

मात्र, शोधमोहिमेदरम्यान त्याच्या हालचाली आणि वर्तनावर पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या निशाणदेहीवरून उसाच्या शेतातून मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

जुन्नर तालुक्यात संतापाची लाट

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिंपळवंडी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत.

घटनास्थळावरील पुरावे संकलित करणे, साक्षीदारांकडून माहिती घेणे आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

या अमानुष घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोपीला कठोरातील कठोर, तसेच फाशीची शिक्षा द्यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी पिंपळवंडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!