जळगाव बायपास NHAI कडून टेस्टिंग’चाच खेळ सुरू, अवजड वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला आहे.
बायपास रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत आता थेट प्रश्न
जिल्ह्यात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात जळगाव बायपास वरील नवनिर्मित रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) खचल्याची धक्कादायक घटना घडली होती. अवघ्या एक वर्षापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम पूर्ण झाले होते.
मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात पुलाची झालेली दयनीय अवस्था पाहता कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत आता थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरातून अवजड वाहतूक; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
बायपासवरील हा पूल बंद झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अवजड वाहतूक थेट जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून वळवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ज्या मुख्य रस्त्यावरून ही अवजड वाहने धावत आहेत, त्याच मार्गावर शहरातील अनेक प्रमुख शाळा आणि महाविद्यालये आहेत.
दररोज हजारो विद्यार्थी याच मार्गाने ये-जा करतात. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस होणाऱ्या प्रचंड गर्दीतही ही वाहने सुसाट धावत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या संथ कारभारामुळे दोन महिलांचा मृत्यू
‘लवकरच पूल पूर्ववत सुरू करू’ अशी घोषणा देणाऱ्या ‘न्हाई’च्या (National Highways Authority of India) अधिकाऱ्यांकडून अजूनही या रस्त्यावर केवळ ‘टेस्टिंग’चाच खेळ सुरू आहे.
प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे जळगावकरांचा जीव हातात आला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या निष्पाप बळींमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, “प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
मोठ्या रेल्वे अपघाताची भीती
खचलेला हा पूल रेल्वे ओव्हर ब्रिज असल्याने पहिल्या घटनेत रेल्वे ट्रॅकवर मोठा अपघात सुदैवाने टळला.
परंतु, भविष्यात हा ‘आरओबी’ पुन्हा खचला आणि खालून रेल्वे जात असल्यास अतिशय भीषण अपघात घडू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.
ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न?
दरम्यान, निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाबाबत पूर्णपणे मौन पाळले आहे.
कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने, संबंधित दोषी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी दाट शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.









