पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मोठा धक्का बसला आहे.
विद्यानंद बापट यांना माफी मागण्यासाठी इशारा
पुणे: पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मोठा धक्का बसला आहे.
गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेशाविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत बापट यांनी लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या नोटीसद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीत समाधानकारक खुलासा न झाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या हाय-डेसिबल डीजे साऊंड सिस्टिमविरोधात विद्यानंद बापट सातत्याने भूमिका मांडत आहेत.
या आंदोलनादरम्यान पुणेकरांनी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान बापट यांना मारहाण देखील झाली होती.
मात्र, या मुलाखतीतील त्यांचे काही मुद्दे आणि वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ही वक्तव्ये हिंदू धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा दावा ॲड. प्रदीप नाईक यांनी केला आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको: ॲड. नाईक
ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांवर कायदेशीर आणि सभ्य मार्गाने मत मांडण्याच्या अधिकाराला आपला अजिबात विरोध नाही, असे ॲड. नाईक यांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.
मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
एका व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, अशी ठाम भूमिका या नोटीसच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुका ७२-७२ तास सुरू राहतात आणि त्यात सतत डीजेचा गोंगाट असतो, यावर पुण्यातून तीव्र विरोध होत आहे.
राजकीय नेत्यांमध्येही डीजे बंदीबाबत मतमतांतरे असून, पारंपरिक वाद्यांचा गजर करून सण शांततेत आणि संस्कृती जपून साजरे करता येतात, मग या गोंगाटाची काय गरज? असा सूर बहुतांश नेत्यांकडून उमटत आहे.
या पार्श्वभूमीवर आता बापट यांना मिळालेल्या या कायदेशीर नोटीसमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.









