Pune MPSC News : “आयपीएलसारख्या एमपीएससीच्या जागा लिलावात काढा!” विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून अभिजीत दिपके स्तब्ध; सरकारवर जोरदार हल्लाबोल


पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके हे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले.

पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजीत दिपके यांचा पाठिंबा

पुणे: पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके हे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना राज्यातील सद्यस्थितीवर आणि शिक्षण व्यवस्थेवर अत्यंत तिखट शब्दांत भाष्य केले.

“आज आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की, ज्यांच्याकडे पदव्या आहेत ते रस्त्यावर बसलेत आणि ज्यांना शिक्षणाची कदर नाही, ते खुर्चीवर बसले आहेत,” असा सणसणीत टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीने विचारलेल्या अत्यंत भावनिक आणि रोकठोक प्रश्नांमुळे काही काळासाठी वातावरण स्तब्ध झाले होते.

त्या विद्यार्थिनीने विचारले, “जर आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत, तर आज आपल्याला शिक्षणासाठी मैदानात का उतरावे लागत आहे? शेतकरी अन्नासाठी मरतोय आणि विद्यार्थी रस्त्यावर येतोय.

भ्रष्ट अधिकारी आमचा रस्ता अडवून बसले असतील तर आम्ही काय करायचे?” विद्यार्थिनीचे हे उद्विग्न प्रश्न ऐकून अभिजीत दिपके देखील काही क्षण शांत झाले.

एमपीएससीच्या ढिसाळ कारभारावर विद्यार्थ्यांचा संताप

त्यानंतर विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या ढिसाळ कारभारावर, वारंवार बदलणाऱ्या परीक्षा पद्धतींवर आणि २० ते ४० लाख रुपये घेऊन होणाऱ्या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त केला.

यावर बोलताना अभिजीत दिपकेंनी राज्य सरकारवर आणि प्रशासनावर उपरोधिक आणि जोरदार हल्लाबोल केला.

तर परीक्षा घेण्याची गरजच काय?

दिपके म्हणाले, “जर पैशांच्या जोरावरच सगळे होणार असेल, तर परीक्षा घेण्याची गरजच काय? आयपीएलमध्ये (IPL) जशी क्रिकेटपटूंची बोली लावली जाते, तशीच तुम्ही उमेदवारांची बोली लावा.

लिलावाप्रमाणे एमपीएससीच्या जागा विकायला काढा. तुम्ही आमदार फोडतानाही ‘५० खोके एकदम ओके’ हेच करता.

मग एमपीएससी आणि निवडणुकांमध्येही तेच करा. जो जास्त पैसे देईल, त्याला थेट सीट द्या.

यामुळे किमान काळा पैसा तरी थांबेल आणि सगळे व्यवहार पांढरे (व्हाईट) होऊन जातील.”

रोहित पवारांचे कौतुक करताना ते म्हणाले की, रोहित सर मला मार्गदर्शन करायला सांगतात, पण हे विद्यार्थी माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आणि प्रगल्भ आहेत.

या आंदोलनामुळे पुण्यातील राजकीय आणि शैक्षणिक वातावरण चांगलेच तापले असून, विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आता मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!